वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर आणि भा.कृ.अनु.प-केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विशेष कापूस प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी मौजे आसडी ता. सिल्लोड येथे कापूस शेती दिन घेण्यात आला. या शेती दिनामध्ये दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून केव्हीके चे प्रमुख तथा प्रकल्प अधिकारी डॉ.किशोर झाडे, विषय विषेशज्ञ तथा उप प्रकल्प अधिकारी डॉ.बस्वराज पिसुरे, विषय विशेषज्ञ डॉ.संजूला भावर यंग प्रोफेशनल टू श्री.सतीश कदम, पंचायत समिती कृषि अधिकारी, सिल्लोड श्री.व्यास, प्रगतशील शेतकरी श्री.नाना चापे, प्रगतशील शेतकरी श्री.कौतिक मिरगे, श्री.कृष्णा झलवार व इतर शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.झाडे म्हणाले की, दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान चा अवलंब शेतकरी मोठ्या प्रमाणात करत आहेत. या तंत्रज्ञानाच्या अवलंबन केलेल्या शेतकऱ्यांमध्ये कापसाचे उत्पन्न जास्त आल्याचे अनुभव आलेले आहेत. यावेळी ते म्हणाले की, दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञानामध्ये गळ फांदी काढणे व शेंडा खुडणे ही महत्त्वाची कामे आहेत. तसेच कापसाची लागवड ही ९० × ३० सेंटिमीटर या अंतरावर करावी. या पद्धतीने झाडांची एकरी संख्या वाढून उत्पन्न वाढते. अन्नद्रव्य, कीड व रोग व्यवस्थापनासाठी एकात्मिक एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. ज्यामध्ये निळे व पिवळे चिकट सापळे लावणे, कामगंध सापळे लावणे, निंबोळी अर्काचा नियमितपणे वापर करणे, जैविक बुरशीनाशकांचा वापर करणे, इत्यादी पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. तसेच सद्य परिस्थितीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी कापसाची फरदड न घेता कापसाच्या पऱ्हाटी कुट्टी करून ती जमिनीमध्ये कुजवावी. जेणेकरून जमिनीला मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय खत उपलब्ध होते व जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते तसेच जमिनीचा सेंद्रिय कर्ब देखील वाढतो.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.पिसुरे यांनी विशेष कापूस प्रकल्पाविषयी माहिती देऊन कृषी विज्ञान केंद्र मधील उपलब्ध असलेल्या जैविक खते व जैविक बुरशीनाशके व इतर सुविधांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ.भावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपल्या भागामध्ये अद्रक पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते तर आद्रकीमध्ये बेणे प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे.त्याचप्रमाणे कंद सोड कंदकुजसाठी जैविक बुरशीनाशकाचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नवीन फळबाग लागवड करत असताना सर्वांनी माती परीक्षण करूनच फळबाग लागवड करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी दादा लाड तंत्रज्ञानाद्वारे कापूस लागवड करणाऱ्या कौतिक मिरगे यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, पारंपरिक पद्धती पेक्षा दादा लाड तंत्रज्ञानामुळे उत्पन्नात नक्कीच वाढ झालेली आहे. तरी शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. यावेळी श्री.नाना चापे यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आयोजन व आभार प्रदर्शन श्री.सतीश कदम यांनी केले.