विष्णू वाकडे
मोसंबीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्ह्याला येथील मोसंबी उत्पादक मंडळींनी मोसंबीला जी. आय. मानांकन मिळवून दिले आहे. ही सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट असली तरी, आज घडीला फळगळती रोखणे हे मोसंबी उत्पादकांसमोरील सर्वांत जटिल समस्या होऊन बसली आहे. आयत्या वेळेवर केलेल्या उपाययोजना कुचकामी ठरत असून, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि ठोस उपाययोजनांची खरी गरज आहे.
सन २००६ मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत तत्कालीन जिल्हा कृषी अधिकारी एस. एल. जाधव यांनी जिल्ह्यातील फळबागांकडे विशेष लक्ष दिले होते. यामुळे जिल्ह्यातील मोसंबी क्षेत्र ४० हजार हेक्टरच्या पुढे गेले होते. मात्र, दरम्यानच्या काळात पडलेल्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील मोसंबीचे क्षेत्रात घट झाली होती. आजच्या घडीला जिल्ह्यातील मोसंबी ही स्थिरतेच्या वाटेवर असली तरीही, वारंवार फळगळतीच्या समस्यांनी मोसंबी उत्पादक प्रचंड अडचणी सापडले आहेत.
कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार सध्या जिल्ह्यामध्ये २८ हजार ६७४ हेक्टरवर मोसंबी क्षेत्र असून, फळगळीमुळे मोसंबी उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. अशा स्थितीत फळबागायतदारांना शासनाकडून सातत्यपूर्ण मार्गदर्शनाची आणि ठोस उपाययोजनाची गरज आहे. त्या शिवाय शेतकऱ्यांना मोसंबी फळगळतीपासून दिलासा मिळणार नाही.
परराज्यातून मोसंबीला मागणी
मोसंबी स्थानिक बाजारपेठेसह दिल्ली, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, कलकत्ता येथे विक्रीला जाते. प्रामुख्याने वाराणसी, तिलिगुडी, आग्रा, मथुरा, लुधियाना, जालंदर, कानपूरसह इतर ठिकाणीही चांगली मागणी आहे.
जिल्ह्यातील मोसंबीचे क्षेत्र
जालना तालुक्यात जवळपास चार हजार हेक्टर, अंबड आणि घनसावंगी तालुक्यात १४ हजार हेक्टरपेक्षा अधिक, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, परतूर आणि मंठा या तालुक्यात मिळून १० हजार हेक्टरपेक्षा अधिक मोसंबीचे क्षेत्र आहे.
बुरशीजन्य रोगामुळे मोसंबीच्या झाडांना फळे किती टिकतील माहीत नाही. या संकटातून जी फळे शेतकऱ्यांनी वाचविली त्या फळांना योग्य भाव मिळेलच असे होत नाही. असेच एकामागून एक संकट शेतकऱ्यांवर येत राहिली तर, जीआय मानांकन मिळालेली मोसंबी फळपीक जिल्ह्यातून हद्दपार होईल. - गणेश थोरात, मोसंबी उत्पादक, माळी पिंपळगाव.
हवामान बदलामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मोसंबी उत्पादकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. झालेला स्वर्चसुद्धा निघत नाही. मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना फळगळ व एप्रिल, मे मध्ये पाण्याअभावी जळून गेलेल्या बागांची नुकसानभरपाई देऊन मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि या संकटातून बाहेर काढावे. - भगवानराव डोंगरे, सावरगाव.
ढगाळ हवामान, वाढलेले तापमान, पाण्याचा ताण यामुळे प्रकाश संश्लेनेवर परिणाम झाल्याने फळगळीचे प्रमाण वाढले आहे. झाडाचे अपुरे पोषण, पाण्याचा ताण यामुळेदेखील फळांची गळती होते. - प्रा. अजय मिटकरी, कीटकशास्त्रज्ञ.