Join us

अफवांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; फळात इंजेक्शन दिले जात असल्याची पसरवली जाते अफवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 11:35 IST

सोशल मीडियावर द्राक्षे, डाळिंब किंवा टरबुजांमध्ये घातक औषध फवारणीची खोटी आणि बनावट माहिती प्रसारित केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

श्रीरामपूर: सोशल मीडियावर द्राक्षे, डाळिंब किंवा टरबुजांमध्ये घातक औषध फवारणीची खोटी आणि बनावट माहिती प्रसारित केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

गतवर्षी द्राक्षावरील औषध फवारणीच्या सोशल मीडियावरील एका खोट्या व्हिडीओमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना किलोमागे १० रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. विशेष म्हणजे हा व्हिडीओ उत्तर भारतातील एका माथेफिरूने प्रसारित केला होता.

जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोल्हार, बाभळेश्वर, तसेच श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव, श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव, घारगाव, बेलवंडी, लोणीव्यंकनाथ हा परिसर द्राक्ष उत्पादनासाठी ओळखला जातो.

द्राक्ष हे हंगामी फळ मानले जाते. ऐन उन्हाळ्यामध्ये ग्राहकांना थंडावा देण्यासाठी हे फळ बाजारात येते.

मात्र, ऐन विक्रीच्या वेळी खोटी माहिती प्रसारित करून शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात, असे द्राक्ष उत्पादकांचे म्हणणे आहे. डाळिंब, टरबूज उत्पादकही खोट्या माहितीच्या प्रसारामुळे चिंतेत आहेत.

द्राक्ष हे विषमुक्तकोल्हार येथील तरुण शेतकरी अनिरुद्ध खर्डे यांनी रशियामध्ये यंदा द्राक्षांची निर्यात केली आहे. निर्यात द्राक्षांच्या दर्जाचा काही माल त्यांनी स्थानिक बाजारात आणला. स्थानिक ग्राहकांना निर्यातीच्या दर्जाचा माल विक्री करत आहोत, असे खर्डे यांनी सांगितले.

९० दिवसांआधी फवारणी केली जाते बंदद्राक्षांवरील औषध फवारणी ही माल तोडणीपूर्वी २० दिवस बंद केली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष द्राक्ष ग्राहकांच्या हाती पडेपर्यंत त्यात औषधांची मात्रा शून्य झालेली असते. युरोप, अमेरिकेतील ग्राहकांना त्याच मालाची निर्यात होते.

द्राक्ष आहेत गुणकारीद्राक्ष हे हंगामी फळ आहे. त्यात अनेक जीवनसत्वे, अँटिऑक्सिडंटस सामावलेले असतात. हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी द्राक्ष हे गुणकारी मानले जातात.

वर्षातील ३६५ दिवसांपैकी ३६३ दिवस कष्ट घ्यावे लागतात. शेतकरी हा बागेला लहान मुलांप्रमाणे जपणूक करतो. मात्र, सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीमुळे किलोमागे १० रुपयांचे नुकसान होते. - सचिन कडू, कोल्हार, शेतकरी

अधिक वाचा: गाईच्या मल-मूत्रातून पिकवली हळद; नऊ महिन्यांत केली साडेचार लाख रुपयांची कमाई

टॅग्स :द्राक्षेफळेकाढणीशेतीशेतकरीबाजारमार्केट यार्ड