सोलापूर : जिल्ह्यातील साखर हंगाम यंदा लवकरच आटोपला असला, तरी उसाच्या पैशांचे वांदे कायम आहे. ऊस गाळपाला आणण्यासाठी घाई करणाऱ्या साखर कारखान्यांनी एफआरपीसाठी शेतकऱ्यांना हातघाईला आणले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील १४ आणि धाराशिवच्या दोन, अशा सोलापूर प्रादेशिक विभागातील १६ साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाईच्या नोटीस बजावल्या आहेत.
दरम्यान जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांचा पट्टा पडला असून, एक-दोन दिवसांत दहा कारखाने बंद होतील, असे सांगण्यात आले. विधानसभा निवडणुका व दिवाळीच्या कारणामुळे राज्याचा साखर हंगाम यंदा उशिरा सुरू झाला आहे.
५ नोव्हेंबरला व त्यानंतरही काही साखर कारखाने सुरू झाले. मात्र, यंदा जिल्ह्यात ऊस क्षेत्र कमी असल्याने अनेक कारखान्यांचे गाळप पूर्ण क्षमतेने चालले नाही.
कोणाची एक पाळी, कोणाची दोन पाळी, तर एखाद्याच कारखान्यांच्या तीन पाळ्या चालल्या. उसाच्या क्षेत्राचा अंदाज आल्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना गोड बोलून ऊस तोडणी करून घेतला.
शेतकऱ्यांना पैसे देण्याचा विषय मात्र कारखान्यांच्या ध्यानी नाही. जिल्ह्यातील अशा २३ साखर कारखान्यांना अगोदर शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविल्याच्या नोटिसा दिल्या होत्या. त्यानंतर काही कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले.
मात्र सोलापूर जिल्ह्यातील १४ व धाराशिवच्या दोन अशा १६ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविले आहेत. अशा १६ साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाईची नोटीस बजावली आहे. १३ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
या कारखान्यांचा पट्टा पडला धाराशिव (सांगोला सहकारी), सिद्धनाथ शुगर तिर्हे, येडेश्वरी बार्शी, मातोश्री लक्ष्मी शुगर व भैरवनाथ शुगर आलेगाव हे पाच साखर कारखान्यांचा पट्टा पडला असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
यांना बजावल्या नोटिसा श्री सिद्धेश्वर सोलापूर, श्री पांडुरंग पंढरपूर, सिद्धनाथ शुगर तिर्हे, लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे, जकराया शुगर, युटोपियन मंगळवेढा, भैरवनाथ लवंगी, भैरवनाथ आलेगाव, इंद्रेश्वर बार्शी, धाराशिव (सांगोला), अवताडे शुगर, लोकनेते बाबूरावअण्णा पाटील अनगर, बबनराव शिंदे तुर्क पिंपरी (सर्व सोलापूर), भैरवनाथ वाशी व धाराशिव चोराखळी (धाराशिव) या साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा बजावल्या आहेत.
१५ जानेवारीपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे ४८४ कोटी ३० लाख रुपये व धाराशिव जिल्ह्यातील कारखान्यांकडे ६८ कोटी २७ लाख, अशी सोलापूर प्रादेशिक विभागातील कारखान्यांकडे ५५२ कोटी २७ लाख रुपये एफआरपीचे अडकले आहेत.
अधिक वाचा: खोडवा ऊस व्यवस्थापनातील चार कामे एकाच वेळी करणारे औजार; पाहूया सविस्तर