वाशिम : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या (farmers suicide) रोखण्याचा प्रयत्न म्हणून जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे चार निर्णय घेतले आहेत. त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.
शेती करताना शेतकऱ्यांना विविध अडचणींतून जावे लागते. आर्थिक संकट कोसळले आणि त्यातून बाहेर येण्याचा मार्ग सापडत नसेल तर शेतकरी मृत्यूला कवटाळतो.
शेतकरी आत्महत्येची प्रकरणे वाढत असल्याने, आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न म्हणून जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी महत्त्वाचे चार निर्णय घेतले. शेतकऱ्यांच्या समस्यांचे ऑन दी स्पॉट (On the Spot) निराकरण करण्यासाठी यंत्रणांनी कर्तव्य बजावावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
समस्यांचे निराकरण
निराशेच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेला सूचना दिल्या.
कर्ज माफीचा विचार
जिल्ह्यातील लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारकडे अहवाल सादर करणे.
मानसिक आरोग्य उपाययोजना
शेतकऱ्यांसाठी मानसिक आरोग्य शिबिरे आणि समुपदेशन सेवांची स्थापना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलली जाणार आहेत.
कृषी सल्लागार केंद्राची स्थापना
शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी तालुका पातळीवर कृषी सल्लागार केंद्रे सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जातील.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल. याबाबत यंत्रणेला सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी देखील कठीण परिस्थितीत खचून जाऊ नये. आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये. - बुवनेश्वरी एस., जिल्हाधिकारी, वाशिम