Join us

शेतकऱ्यांनो व्हॉटस अप वर येतेय पीएम किसान अॅपची लिंक.. क्लिक कराल तर बँक खाते होईल साफ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 10:34 AM

PM Kisan Fake Mobile App आपल्याला कर्ज हवे आहे, क्रेडिट कार्ड बंद करायचेय, कार्ड ब्लॉक करायचे आहे, आयकर परतावा मंजूर झाला आहे, अशी अनेक कारणे सांगून अॅप डाउनलोड करायला लावले जाते.

वेगवेगळे आमिष दाखवत अलीकडे ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढत असून, त्याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे. विमा कंपन्यांमार्फत बोनस दिला जात असण्यासह शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केली जात आहे.

त्यामुळे अशा फसव्या लिंकला बळी पडल्यास आपले बँक खाते साफ होऊ शकते. जिल्ह्यात अशाप्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीच्या २९ तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत.

आपल्याला कर्ज हवे आहे, क्रेडिट कार्ड बंद करायचेय, कार्ड ब्लॉक करायचे आहे, आयकर परतावा मंजूर झाला आहे, अशी अनेक कारणे सांगून अॅप डाउनलोड करायला लावले जाते.

किंवा लिंकवर जाऊन क्लिक करायला कोणी सांगितले अन् तुम्ही तसे केले तर क्षणातच तुमचे बँक खाते साफ केले जाते. यात वेगवेगळ्या कारणांनी फसवणूक केली जात असल्यामुळे नागरिकांना मोठा फटका बसू शकतो.

शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावे फसवणूक• जानेवारी ते सप्टेंबर २०२४ या नऊ महिन्यांत वेगवेगळ्या पद्धतीचे आमिष दाखवत फसवणूक करण्यात आली आहे.• यामध्ये शेअर मार्केट ट्रेडिंगद्वारे नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचे प्रमाण वाढत आहे.• यामध्ये ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास मोठा मोबदला देण्याचे आमिष दाखविले जाते. मात्र, मोबदला तर दूरच हातची मुद्दल रक्कमही जाते.

काय काळजी घ्याल?१) संगणक, लॅपटॉप व मोबाइलमधील आपली माहिती, फोटो सुरक्षित करण्यासाठी अद्ययावत अँटी व्हायरसचा वापर करावा.२) या उपकरणांचा पासवर्ड वेळोवेळी बदलवावा, पासवर्ड हा सहज ओळखता येणार नाही असा असावा.३) कोणतेही ऑनलाइन कर्ज देणारे अॅप्लिकेशन घेऊ नये व वैयक्तिक माहिती अपलोड करू नये.४) कोणत्याही अनोळखी व्यक्तीची संपूर्ण खात्री पटल्याशिवाय फेसबुक, द्विटर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट वगैरे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू अगर स्वीकारू नये.

फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे सर्वात मोठी सुरक्षितता आहे. आपली गोपनीय माहिती, ओटीपी कोणाला देऊ नये. तसेच समोरील व्यक्तीने सांगितलेले कोणतेही अॅप डाउनलोड करू नये. - अरुण देवकर, पोलिस निरीक्षक, सायबर सेल प्रभारी

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाव्हॉट्सअ‍ॅपशेतकरीमेसेंजरसरकारशेअर बाजारपोलिस