Join us

Maize Farming : दूग्धव्यवसाय अन् पोल्ट्रीमुळे सोयाबीन उत्पादकांचा मका लागवडीकडे वाढला कल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 2:27 PM

Crop Pattern : राज्यात खरिपातील एकूण क्षेत्रापैकी ७ टक्क्यापर्यंत म्हणजे ११ लाख हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड केली जाते. तर यंदा ७.६ टक्के क्षेत्रावर मक्याची लागवड झालेली आहे. मक्याचे वाढते दर लक्षात घेता शेतकऱ्यांचा मक्याकडे कल वाढताना दिसत आहे.

Pune : मागील दोन दशकांमध्ये राज्यातील पीकपद्धतीमध्ये मोठा बदल झाला आहे. यंदा राज्यात एकूण १ कोटी ४५ लाख हेक्टरवर खरिप पिकांची पेरणी झालेली आहे. त्यातील सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांनी राज्यातील जवळपास ६२ टक्के क्षेत्र व्यापलं असून सोयाबीनखाली ५१ लाख हेक्टर तर कापसाखाली ४० लाख हेक्टर आहे. पण पश्चिम महाराष्ट्रातील सोयाबीन लागवडीखालील परिसरामध्ये आता मक्याचे क्षेत्र वाढू लागले आहे. 

दरम्यान, राज्यात खरिपातील एकूण क्षेत्रापैकी ७ टक्क्यापर्यंत म्हणजे ११ लाख हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड केली जाते. तर यंदा ७.६ टक्के क्षेत्रावर मक्याची लागवड झालेली आहे. मक्याचे वाढते दर लक्षात घेता शेतकऱ्यांचा मक्याकडे कल वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर इथेनॉल, पशुखाद्य यामध्ये मक्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने मक्याची मागणीही वाढू लागली आहे. 

महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर हे प्रामुख्याने दूध उत्पादक जिल्हे आहेत. तर याच भागांमध्ये जे क्षेत्र सोयाबीनखाली होते त्या क्षेत्रावर आता मक्याची लागवड वाढू लागली आहे. दुग्धव्यवसाय, पोल्ट्री व्यवसायामध्ये मक्याची मागणी वाढल्यामुळे आणि मुरघास निर्मितीमुळे मक्याच्या मुल्यसाखळीमध्ये वाढ होताना दिसत आहे. तुलनेने सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्यामुळे या पट्ट्यातील शेतकऱ्यांचा मका लागवडीकडे कल वाढू लागलाय.

मागणी कशासाठी?केंद्र सरकारने येणाऱ्या २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यामुळे सध्या साखरेपासून, बांबूपासून आणि मक्यापासून इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प देशभरामध्ये उभे राहत आहेत. मक्यापासूनही इथेनॉल निर्मिती होत असल्यामुळे मागणी वाढली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पोल्ट्री उद्योगाला भरारी आल्यामुळे पशुखाद्य आणि कोंबडीखाद्याची मागणी वाढली. या खाद्यामध्ये मक्याचा प्रामुख्याने वापर केला जातो. यामुळेही मक्याची मागणी वाढली आहे.

मुरघास आणि दरमक्यापासून मोठ्या प्रमाणावर मुरघास निर्मिती होत आहे. दुग्धव्यवसायासाठी जनावरांना खाद्य म्हणून मुरघास वापरला जातो. त्यामुळे भूमीहीन दुग्धव्यवसायिकांसाठी मुरघास विकत घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे मुरघास तयार करून विकण्याची मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. 

महाराष्ट्रातील दूध उत्पादक आणि पोल्ट्री व्यवसाय जोरात सुरू असलेल्या जिल्ह्यांमध्ये आता मक्याला मागणी वाढू लागलीये. इथेनॉल निर्मितीमुळेही मक्याला चांगले दिवस येणार आहेत. मक्याची मुल्यसाखळी वाढत असल्यामुळे नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली या पट्ट्यातील मका क्षेत्र वाढतंय.- डॉ. सोमिनाथ घोळवे (शेतीप्रश्नांचे अभ्यासक)

टॅग्स :शेती क्षेत्रपीकपीक विमासोयाबीनमका