यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सर्वच पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कापसाचे उत्पन्न कमी निघाले. अशातच शासनाने कापसाला कवडीमोल ७ हजार २० रुपये क्विंटल हमीभाव दिला आहे. तर खासगी जिनिंगवाले ७ हजार ३०० रुपये भाव देत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दुष्काळात अडकलेल्या शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याला शासनाने भाव वाढवून द्यावा,अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यंदा कमी पाऊस झाल्यामुळे त्याचा फटका कापसाला बसला आहे.
कापसाला गतवर्षी ७३०० ते ७८०० रुपये क्विंटल भाव होता. तर केंद्र सरकारचा कापसाला हमीभाव ६०८० ते ६३८० होता. यंदा कापसाला शासनाचा हमीभाव ६०८० ते ७०२० रुपये क्विंटल तर खासगी भाव ७३०० रुपये क्विंटल आहे. या वर्षी तालुक्यात सुरुवातीपासूनच पाऊस कमी झाला. त्यात पिके जोमात येण्याच्या वेळेला तालुक्यातील १३ मंडळात सरासरीपेक्षा अंत्यत कमी पाऊस झाला. परिणामी कापसाची वाढच झाली नाही. त्यात भरघोस उत्पन्न निघण्याऐवजी उत्पन्न कमी निघाले.
कापसाचे दर ८ हजारांच्या उंबरठ्यावर!
शासनाने गेवराई तालुक्यात एकही शासकीय जिंनिग सुरू केली नसून कापसाला ७०२० रुपये क्विंटल हमीभाव दिला. त्यात खासगी जिनिंगवाले ७३०० रुपये क्विंटल भाव देत आहे. त्यामुळे शेतकऱ्याने कापसावर केलेला खर्चदेखील निघत नसल्याचे शेतकरी नारायण फरतारे यानी सांगितले. तालुक्यातील शेतकरी दुष्काळात अडकलेला असून शासनाने कापसाला भाव वाढवून द्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.