सोलापूर : सन २०२३ मधील खरीप दुष्काळाच्या अनुषंगाने ५ लाख १९ हजार ८४९ बाधित शेतकऱ्यांना ६८९ कोटी अनुदान महसूल व वन विभागाकडील २९ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजूर झालेले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली आहे.
ई-केवायसी न केलेल्या ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही, त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असून, संबंधित शेतकऱ्यांनी १० जुलै २०२४ पर्यंत कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सद्यःस्थितीत बार्शी तालुक्यातील ३५५०, माढा तालुक्यातील ३२४०, करमाळा तालुक्यातील १९७०, सांगोला तालुक्यातील ३६७८ आणि माळशिरस तालुक्यातील ५४२८ बाधित शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण न झाल्याने रक्कम २१ कोटी ६५ लाख ५६ हजार ४९५ रुपये प्रलंबित आहे.
तसेच, सोलापूर जिल्ह्यातील अंदाजित १ लाख खातेदारांना त्यांची बँक व आधारकार्ड संलग्न नसल्यामुळे, सामाईक खातेदारांची कोणत्या खात्यावर रक्कम जमा करावी, याबाबतची संमतीपत्र दिले नसल्याने, मृत खातेदारांची वारस नोंद झाली नसल्याने, तसेच परगावीच्या खातेदारांचे बँक तपशील, आधारकार्ड तपशील इ. उपलब्ध न झाल्याने अनुदान वाटप करणे प्रलंबित आहे.
अनुदान न मिळालेल्या खातेदारांना कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत संबंधित तलाठी कार्यालय अथवा तहसील कार्यालय यांच्याकडे १० जुलै २०२४ पूर्वी संपर्क करण्याचे आवाहन केले असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
शेतकऱ्यांची यादी ई-पंचनामा पोर्टलवर
दरम्यान, बार्शी, माढा, करमाळा, सांगोला आणि माळशिरस या तालुक्यांचा समावेश आहे. अनुदान बार्शी तालुक्यातील ३१ हजार ३९५ बाधित शेतकरी, माढा तालुक्यातील ७६ हजार ७२४ बाधित शेतकरी, करमाळा तालुक्यातील ७२ हजार ११३ बाधित शेतकरी, सांगोला तालुक्यातील ७५ हजार ६१६ बाधित शेतकरी आणि माळशिरस तालुक्यातील ७७ हजार ९५१ बाधित शेतकऱ्यांना मदत निधी वितरीत करण्यासाठी संबंधित तहसीलदार यांनी बाधित शेतकऱ्यांची यादी ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड केली आहे. या यादीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी दिली आहे.
तीन लाख शेतकऱ्यांना मिळाली मदत
शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करण्यात आलेली आहे. यामध्ये बार्शी तालुक्यातील २१ हजार २५२, माढा तालुक्यातील ६४८७१, करमाळा तालुक्यातील ६२८५९, सांगोला तालुक्यातील ६४६५० आणि माळशिरस तालुक्यातील ६३ हजार ७९२, असे एकूण २ लाख ७७ हजार ४२४ बाधित शेतकऱ्यांना ४८९ कोटी रकमेच्या मदतीचा समावेश आहे.