बनावट कीटकनाशके बनवून विकणाऱ्या शेतकऱ्यांनाही आता शिक्षा होणार आहे. बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशके उत्पादक कंपन्यांमुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत आहे. त्यास प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.
बनावट कीटकनाशकांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सहा महिन्यांपर्यंत कारावास आणि किमान ५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे.
भेसळयुक्त, अप्रमणित बियाणे, खते, बनावट कीटकनाशके यांच्या विक्री आणि वापरामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर राज्य विघातक कारवाया प्रतिबंध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यासह शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळवून देणाऱ्या तरतुदी असणारी विधेयके मुंडे यांनी पावसाळी अधिवेशनात मांडली होती. त्यामध्ये बनावट खते,कीटकनाशके,बियाणे शेतकऱ्यांची फसवणूक करणारे सर्व गुन्हे अजामीनपात्र करण्यात आले होते.
यानुसार दोषींना कारावास आणि एक लाखांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद तसेच संबंधित कंपनीकडून एक महिन्याच्या आत नुकसान भरपाई मिळवून देण्याची तरतूदही यात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारी ही विधेयके सरकारने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अधिक विचार विनिमय करण्यासाठी संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पिकावर रोग पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ते पिकांवर कीटकनाशके फवारतात. ही कीटकनाशके बनावट आहेत किंवा आरोग्यास हानिकारक आहेत याची अनेकदा त्यांना कल्पना नसते. अनावधानाने झालेल्या या नुकसानाकरिताही शेतकऱ्यांना शिक्षा होणार का? असा प्रश्न असून शेतकरी संघटनांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या फसवणुकीबाबत एकच कायदा केल्यास त्याला केंद्र सरकारची मान्यता घ्यावी लागते. त्यामुळे सरकारने राज्यातील सध्याच्या विविध कायद्यांमध्ये सुधारणा करत बनावट किंवा घातक कीटकनाशकांचा होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्याला ही कायद्याच्या चौकटीत आणले आहे.
काय असणार शिक्षा?
- बनावट कीटकनाशकांची निर्मिती- विक्री करणाऱ्या पहिल्या गुन्ह्यासाठी दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड
- दुसऱ्या व त्यानंतरच्या गुन्ह्यांसाठी तीन वर्षांपर्यंतचा कारावास आणि 75 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद
- बनावट किंवा आरोग्यास हानिकारक असणाऱ्या कीटकनाशकांचा वापर करणाऱ्यासही सहा महिन्यांपर्यंतचा कारावास आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची तरतूद