सोलापूर : गावाच्या गावठाणापासून दोनशे मीटर अंतरापर्यंतचे शेतीक्षेत्र अकृषक (गावठाण एनए) करण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील ३७ गावांतील १५३८ शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाने नोटीस बजावली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करायचे आहेत.
प्रत्येक गावातील गावठाण क्षेत्र लोकांनी रहिवासाखाली आणले असून, लगतच्या शेतीक्षेत्रात लोक घरे बांधत आहेत. अनेक कुटुंबांना राहण्यासाठी घर नसल्याने सरकारी घरकुल मंजूर झाले आहे, मात्र बांधण्यासाठी जागा नाही.
याशिवाय एखाद्याला गावात जागा नाही व स्वखर्चातून घर बांधायचे असेल तरीही शेतीक्षेत्राची एक-दोन गुंठ्याची खरेदी होत नसल्याची अडचण आहे. नागरिकांचे जीवन सुकर होण्यासाठी गावठाणपासून दोनशे मीटरपर्यंतचे शेतीक्षेत्र अकृषक (एनए) करून देण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे तहसीलदार नीलेश पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी अर्ज करायचे असून, कागदपत्र पाहून येण्यासाठी आवश्यक पैसे भरण्याबाबत तहसीलदार पत्र देणार आहेत. त्यानंतर दोन दिवसात ५ एप्रिलपर्यंत चलनाने पैसे भरायचे आहेत.
९ एप्रिल रोजी शिबिर आयोजित करण्यात आले असून, त्यावेळी अकृषक (एनए) परवानगी पत्र दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
तालुक्यातील ३७ गावांच्या १५३८ शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. ७७ लाख २४ हजार ५९० चौ. मीटर क्षेत्र येणे करता येईल. त्यासाठी किती रक्कम भरावी लागेल हे शेतकऱ्यांना दिलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत. अर्ज दाखल झालेल्यांना पैसे भरण्यासाठी पत्र दिले जाणार असून, पैसे भरलेल्यांना २ मार्च रोजी शिबिरात परवानगी पत्र दिले जाणार आहे.
यातून साधारण ६६ लाख २१ हजार रुपये महसूल अपेक्षित आहे. शहरासाठी ४२ ब, तर ग्रामीणसाठी ४२ ड या नावाने असे या कार्यक्रमाचे नाव आहे.
अधिक वाचा: Pik Karj : शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार? वाचा सविस्तर