राज्यात झालेल्या पावसानंतर अवकाळीग्रस्त भागांचे पंचनामे तातडीने सादर करण्याचे निर्देश राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आले. शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
राज्यातील पीक पाण्याचा आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची आढावा बैठक आज घेण्यात आली. राज्यात सुमारे एक लाख हेक्टरवर अवकाळी पाऊस आणि गारपीटीने पिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या ठिकाणचे पंचनामे तातडीने सादर करून शेतकर-यांना नुकसानभरपाई देणार असल्याचे सांगण्यात आले.
- दोन दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार असून पंचनामे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- शेतक-यांना तीन हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई मिळणार आहे. प्रचलित कार्यपद्धतीनुसार तातडीने पंचनामे करून ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- बाधित शेतक-यांना तातडीने मदत देण्याकरता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिका-यांकडून प्राप्त करून घेऊन निधी वितरित करण्याचा एकत्रित प्रस्तावावर विभागाने तातडीने निर्णय घेण्याचे मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश देण्यात आले.
याशिवाय शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा करणार असल्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत ट्विटरवरून आजच्या मंत्रिमंडळात झालेले निर्णय देण्यात आले आहेत.