छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी ''मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०'' अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून, त्यापैकी ३ मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे कार्यान्वित झाला आहे.
यामुळे १ हजार ७५३ शेतकऱ्यांना दिवसाही वीज मिळेल. जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. या वर्षी मार्चमध्ये सुरू झालेल्या ९ हजार २०० मेगावॅट विकेंद्रित सौर प्रकल्पाचा हा एक भाग आहे.
प्रकल्पाची संपूर्ण क्षमता डिसेंबर २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार आहे, असे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले. धोंदलगाव येथे महावितरणच्या उपकेंद्रापासून सुमारे सोडतीन किलोमीटर अंतरावर १३ एकर शासकीय जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. अवघ्या साडेचार महिन्यांत प्रकल्प उभारून ५ सप्टेंबर रोजी कार्यान्वित करण्यात आला.
सौर ऊर्जेवर कृषी पंप चालतील
• सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करायची व त्याआधारे कृषीपंप चालवायचे, अशी ही योजना आहे. त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी विकेंद्रित स्वरुपात सौर ऊर्जा निर्मिती केंद्रे उभारण्यात येत आहेत.
• यामुळे शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीजपुरवठा होण्यासोबत स्वस्तात वीज उपलब्ध झाल्याने उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी होणार आहे. या योजनेमुळे कृषी क्षेत्राला मोलाची मदत करण्यासोबतच उद्योगांनाही प्रोत्साहन मिळणार आहे.