एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना विविध निविष्ठांची खरेदी करावी लागते. यात शेतकऱ्यांचा मोठा खर्च होतो. आता पीक संरक्षण औषधी, तणनाशके, जैविक खते, जैविक कीड नियंत्रणासाठी लागणाऱ्या कृषी निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५०० रुपये प्रमाणे कमाल २ हेक्टरपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च काही प्रमाणात वाचणार आहे.
कशासाठी मिळते अनुदान?
पीक संरक्षण औषधी:
पिकाच्या संरक्षणासाठी पिकांवर फवारणी करण्यात येते. या फवारणीसाठी लागणाऱ्या औषधींसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.
जैविक खते :
रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना जैविक खतांच्या वापरासाठी प्रोत्साहित केले जात असून, जैविक खतांसाठीही शेतकऱ्यांना पावतीची अट पूर्ण केल्यास अनुदान दिले जात आहे.
तणनाशके :
तण नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या तणनाशक औषधीसाठीही शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. जैविक खतांप्रमाणेच जैविक कीड नियंत्रणासाठी लागणाऱ्या निविष्ठांकरीताही शेतकऱ्यांना अनुदान मिळत असल्याने त्यांचा खर्च कमी होत आहे.
कोणाला, किती मिळते अनुदान?
कृषी विद्यापिठाच्या शिफारशीनुसार निविष्ठांची खरेदी केल्यास अनुदान देय आहे. एका शेतकऱ्याला कमाल २ हेक्टर मर्यादेपर्यंत त्याचा लाभ मिळू शकतो.
३० डिसेंबरची मुदत, खरेदीची पावती आवश्यक
याबाबतचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे रब्बी हंगामासाठी ३० डिसेंबरपूर्वी सादर करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी निविष्ठा खरेदी करून त्याची खरेदी पावती, सातबारा, आधार कार्ड व बँक खात्याचा तपशील आदि कागदपत्रे कृषी विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर बँक खात्यात अनुदान जमा केले जाते.