Join us

शेतकऱ्यांचे वऱ्हाड निघणार फॉरेनला, लगेच अर्ज करा..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 9:13 AM

कृषी क्षेत्रात प्रगती साधलेल्या जर्मनी, फ्रान्स, स्पेन, स्वीत्झर्लंड, ऑस्ट्रेलिया आदी देशात जाण्याची संधी..अर्जासाठी ही अंतिम मुदत..

कृषी क्षेत्रात प्रगती साधलेल्या देशांतील शेतकऱ्यांशी, शास्त्रज्ञांशी संवाद घडवून आणत आपल्याही पारंपरिक शेतीत बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यावर नेले जाणार आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले असून, जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन सोमवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.प्रगत देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी केलेला त्याचा अवलंब, त्याद्वारे झालेली उत्पन्नातील वाढ, याची माहिती आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना करून देण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विदेश दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातून या दौऱ्यासाठी तीन शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. अटी-शर्तीत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची सोडत काढून ही निवड होणार आहे. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने केले आहे. अर्जासाठी ३१ जानेवारी ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

संबंधित वृत्त-शेतकऱ्यांनो परदेशी जायचंय, कसा काढाल पासपोर्ट?

या देशात दौऱ्याची शक्यता...

कृषी क्षेत्रात प्रगती साधलेल्या जर्मनी, फ्रान्स, स्पेन, स्वीत्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नेदरलँड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड, पेरु, ब्राझील, चिली, सिंगापूर आदी देशांची संभाव्य म्हणून निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना यापैकी एका देशात दौयाला जाण्याची संधी असणार आहे.

राज्यातून १२० शेतकरी...

राज्य शासन पुरस्कृत या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील १२० शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी पाठविले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून ३ शेतकऱ्यांची निवड या योजनेंतर्गत केली जात आहे. यानुसार १०२ शेतकरी निवडले जातील. राज्यस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार १८ शेतकऱ्यांची निवड होणार आहे. सोबत ६ कृषी विभागातील अधिकारीही असणार आहेत.

टॅग्स :शेतकरीशेतीशेती क्षेत्र