खरिपाची (Kharip) पेरणी नांदेड जिल्ह्यात शंभर टक्के पूर्ण झाली असून, पिकेही जोमात उभी आहेत. पिकांची वाढ चांगली व्हावी, यासाठी शेतकरी युरिया खताची मात्रा देत आहेत. त्याप्रमाणात गेल्या काही दिवसांपासून युरिया खत बाजारात उपलब्ध नव्हते. शेतकऱ्यांची मागणी वाढल्याने कृषी विभागाकडून जिल्ह्यातील युरिया खताचा २ हजार ५०० मेट्रिक टन बफर स्टॉक खुला केला आहे.
जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामासाठी पावणे आठ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले होते, तर २३ जुलै अखेर जिल्ह्यात सव्वासात लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी पूर्ण झालेली आहे. सध्या सोयाबीन, कापूस, मूग, उडिदासह अन्य पिकेही चांगल्या अवस्थेत आहेत. अधूनमधून पडणाऱ्या पावसावर शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली असून, सध्या पिके जोमात डोलत आहेत. पिकांची वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांकडून खताची मात्रा दिली जाते. त्यात युरिया खताला अधिक प्राधान्य देतात. युरिया खताची अधिक मागणी आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्याला २ लाख ४१ हजार ८३० मेट्रिक टन खताची मागणी शासनाकडे पाठविण्यात आली होती. तर कृषी आयुक्तालयाकडून २ लाख ६०० मेट्रिक टन खत मंजूर करण्यात आला.
मागणी ६४ हजार, मिळाले ३६ हजार टन जिल्ह्यात पेरणीनंतर सर्वात जास्त युरिया खताचा वापर केला जातो. त्यासाठी शासनाकडे ६४ हजार मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली होती. परंतु, आयुक्तालयाकडून ५३ हजार ९०० मेट्रिक टन खत वितरीत करण्यात आले. पिकांची चांगली वाढ होण्यासाठी युरिया टाकला जात असल्याने काही तालुक्यांत युरियाची कमतरता आहे. त्यासाठी कृषी विभागाने अडीच हजार मेट्रिक टन खताचा शिल्लक साठा खुला केला आहे.
३१ मार्च अखेर ९० हजार ४६३ टन होते शिल्लक ३१ मार्च २०२४ अखेर ९० हजार ४६३ मेट्रिक टन खाताचा साठा शिल्लक होता. त्यामुळे एकूण २ लाख ५ हजार ६४५ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले होते. त्यापैकी १ लाख ३१ हजार ७२८ मेट्रिक टन खताची विक्री झाली असून, १ लाख १९ हजार ९१६ मेट्रिक टन खत साठा शिल्लक आहे. त्यापैकी जुलै महिन्यात आतापर्यंत १ लाख ३७ हजार २६८ वितरीत झाला असून, १ एप्रिलपासून आजपर्यंत १ लाख ६१ हजार १८२ मेट्रिक टन खतांचा पुरवठा करण्यात आला.