अंबड तालुक्यातील मठपिंपळगावासह शेतशिवारात मागील काही दिवसांपासून रानडुकरांनी चांगलाच धुडगूस घातला आहे. मागील वर्षी रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा व उसाच्या पिकांचे म मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाणी टंचाई असतानादेखील शेतकऱ्यांनी अतिशय कठीण परिस्थितीत उसाला पाणी देऊन जगविले. परंतु, रानडुकरांनी उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीची भरपाई द्यावी आणि रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
अंबड तालुक्यात मागील दोन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याचे स्रोत तुडुंब भरलेले होते. मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने बागायती क्षेत्रात वाढ झाली. मठपिंपळगावासह परिसरात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आली आहे. परिसरात पाण्याचा तुटवडा असल्याने अनेकांनी उसाचा जुना खोडवा टाकला असला तरी, ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे त्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने तो टिकवून ठेवले आहे. ऊस जोमात आणला. परंतु अन्नाच्या शोधात भटक्या जनावरांसह रानडुकरे उभ्या पिकात घुसून पिकांची नासाडी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले जात असून, जिवापाड जपलेल्या पिकांची नासाडी होत असल्याने शेतकरी वर्गातून संताप होत आहे.
अन्नाच्या शोधात फिरत असलेली रानडुकरे शेतात येऊन ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत. चांगले आलेले पीक डोळ्यासमोर जमीनदोस्त होत आहे. वन्यप्राण्यांचा धुडगूस असाच सुरू राहिल्यास शेतकऱ्यांना या पिकातून काही हाती लागणार नाही, अशी भीती वाटत आहे. रानडुकरांचे प्रमाण जास्त असल्यामुळे उभी असलेली पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे उत्पन्न किती होणार, असा प्रश्न आहे. रानडुकराचा बंदोबस्त करावा, अशी आमची मागणी आहे.- रामेश्वर जिगे, शेतकरी, मठपिंपळगाव.
वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या मुळावर
* वन्य प्राण्यांच्या तावडीतून ऊस पिकांची सुरक्षा करावी तरी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
* वन्यप्राण्यांपासून जीवितास देखील धोका निर्माण झालेला असल्याने शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
* वन विभागाने तातडीने वन्यप्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.