Join us

Farming Scheme: शेतकरी बांधवांनो, बीज प्रक्रियेच्या या योजनेसाठी मिळतंय दहा लाखांचं अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 10:59 AM

Farming Scheme: शेतकरी बांधवांनो, बीज प्रक्रियेसंदर्भातील ही योजना आहे तुमच्या फायद्याची. त्यातून मिळत आहे दहा लाख रुपयांपर्यंतचे व्याज, तुम्ही लाभ घेतला का?

शेतकरी बांधवांसाठी बीज प्रक्रियेशी (seed treatment) निगडीत ही योजना (farming Scheme) असून त्यातून दहा लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. आज आपण या योजनेबद्दलची (Government scheme for farmers) माहिती जाणून घेणार आहोत.

योजनेसाठी अशी आहे पात्रता या योजनेसाठी नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संघ पात्र असेल. लाभार्थी शेतकरी उत्पादक कंपनी, संघ यांनी तालुका कृषी कार्यालयाने अर्जाला मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रीयीकृत बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित शेतकरी, उत्पादक कंपनी, संघ अनुदानाच्या लाभास पात्र राहील.

लाभार्थी शेतकरी उत्पादक कंपनी, संघ यांनी अर्ज करताना ज्या कार्यक्षेत्रात कंपनी आहे, त्या कार्यालयात अर्ज सादर करावा लागेल. अर्जासोबत शेतकरी उत्पादन कंपनी, नोंदणी प्रमाणपत्र, कमिटी ठराव, मागील तीन वर्षांची बॅलेन्स शीट किंवा ऑडिट रिपोर्ट, ज्या जागेवर बीजप्रक्रिया उद्योग सुरू करायचा आहे, त्याचा मालकी हक्क पुरावा इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागणार आहेत.

काय आहे अन्न व पोषण सुरक्षा कडधान्य योजना?

१) अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य योजना बीजप्रक्रिया संच उभारणीस प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १० लाख रुपये यांपैकी जे कमी असेल तेवढे अनुदान दिले जाणार आहे.

२) या योजनेसाठी नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संघ पात्र असेल. यासाठी प्रथम तालुका कृषी विभाग त्यानंतर बँकेकडे अर्ज सादर करावा लागणार आहे.

बॉक्स : बीज प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी अनुदान

बीज प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १० लाख यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान या योजनेत दिले जाणार आहे.

अर्ज करण्याची ३१ तारखेची मुदत

शेतकरी उत्पादक कंपनी, संघ हे ३१ जुलै २०२४ अखेर कार्यक्षेत्रातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करू शकतात. निवड झालेल्या शेतकरी उत्पादक कंपनीस आवश्यक कागदपत्रांच्या छाननीनंतर पूर्वसंमती देण्यात येईल.

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी करावा अर्ज

नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी, संघ यांनी त्यांच्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत दिलेल्या मुदतीत अर्ज करावेत, ज्या आर्थिक वर्षात पूर्वसंमती देण्यात आली आहे. त्यांचे आर्थिक वर्षात बीजप्रक्रिया संच प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

हा प्रकल्प शेतकरी कंपनी आणि त्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. निवड झालेल्या शेतकरी उत्पादक कंपनीस कागदपत्रांच्या छानणीनंतर पूर्वसंमती देण्यात येईल. पूर्वसंमती मिळाल्यानंतर बीजप्रक्रिया संच उभारणीस कार्यारंभ आदेश दिला जाईल. याचा तालुक्यातील शेतकरी कंपनी आणि संघांनी फायदा घ्यावा. सुनील निकाळजे, तालुका कृषी अधिकारी, मारेगाव.

टॅग्स :सरकारी योजनाशेतकरीशेती