भारतावरील भूकेचे संकट आपल्या संशोधनामुळे दूर करणारे भारतीय हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर झाला आहे. त्यांच्यासोबत कृषी क्षेत्रात मोलाचं योगदान देणारे माजी पंतप्रधान चरण सिंग चौधरी यांनाही मरणोत्तर भारतरत्न जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.
स्वामीनाथन यांचा जन्म तामिळनाडू येथील कुंभकोणम येथे ७ ऑगस्ट १९२५ रोजी झाला होता. त्यांनी १९४३ साली बंगालमध्ये पडलेल्या भीषण दुष्काळामुळे वैद्यकीय शिक्षण सोडून शेती क्षेत्रातील शिक्षण घेण्यास सुरूवात केली. पुढे त्यांनी कृषी क्षेत्रात पदवी घेऊन संशोधन केले. त्यांच्या संशोधनामुळे भारताचे भूकेचे संकट दूर झाले. म्हणून त्यांना हरीतक्रांतीचे जनक असे संबोधले जाते.
ते यूपीएससी परिक्षेतून आयपीएस झाले होते पण त्यांनी पोलीस अधिकारी न होता कृषी क्षेत्रात संशोधन करायचे ठरवले. पुढे नेदरलँडमध्ये बटाट्याच्या अनुवांशिकशास्त्राच्या अभ्यासासाठी गेले आणि त्यामध्ये पीएचडी मिळवली. त्यानंतर ते भारतात परतले आणि वनस्पतींची पैदास या विषयावर त्यांनी काम सुरू केले. गहू व तांदळाचे जास्त उत्पन्न देणारे वाण त्यांनी विकसीत केले करून देशात हरीत क्रांती घडवण्याचे श्रेय स्वामिनाथन यांना जाते. त्यांच्या या संशोधनामुळे भारत भूकेच्या म्हणजेच भारतीयांच्या जेवणातील महत्त्वाचा भाग असलेल्या गहू आणि भाताच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झाला.
विशेष म्हणजे आचार्य विनोबा भावे यांचा स्वामिनाथन यांच्यावर मोठा प्रभाव होता. भावे यांच्या भूदान चळवळीत त्यांनी आपल्या कुटुंबाच्या मालकीची असलेल्या २ हजार एकरपैकी एक तृतियांश जमीन दान केली होती. पुढे चेन्नई येथे वयाच्या ९८ व्या वर्षी म्हणजे २८ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांचे निधन झाले.
त्याचबरोबर भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांनासुद्धा भारतरत्न जाहीर झाला असून त्यांचा जन्मदिवस भारतात किसान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी १९३८ मध्ये कृषी उत्पन्न बाजार विधेयक आणले. पुढे ते अनेक राज्यांनी मंजूर केले होते.