Join us

नादुरुस्त रोहित्र बदलणार; ऑइल गळतीही थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 9:38 AM

नादुरुस्त रोहित्रामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने निरंतर वीज योजना सुरू केली आहे. यासाठी लागणाऱ्या खर्चास शासनाने मंजुरीही दिली आहे.

हिंगोली जिल्ह्यात रोहित्र नादुरुस्त होण्याचे तसेच ऑइल गळती होण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने पिकांना पाणी देणे अवघड बनत आहे. आता मात्र शासनाने निरंतर वीज योजना सुरू केली असून, यात १५ वर्षांपेक्षा जास्त जुने व तांत्रिकदृष्ट्या अकार्यक्षम असलेले विद्युत रोहित्रे बदलता येणार आहेत. यामुळे वीजपुरवठा सुरळीत होऊन शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येणे शक्य होणार आहे.

जिल्ह्यात यंदा २ लाख १२ हजार ४४९ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचा पेरा झाला आहे. यात हरभरा पिकांसह सिंचनाची पिकेही घेतली आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी नियोजन करतात. पिकांना योग्यवेळी पाणी मिळाले तर उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते.

मात्र, पिकांना पाणी देण्याच्या ऐनवेळी विद्युत रोहित्रात बिघाड होणे, ऑइल गळती होणे असे प्रकार घडतात. यात विद्युत रोहित्र दुरुस्त करून आणण्यासाठी बरेच दिवस जातात. आर्थिक भारही सहन करावा लागतो. उत्पादनातही घट होत असल्याने शेतकरी त्रस्त होतात.

नादुरुस्त रोहित्रामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने निरंतर वीज योजना सुरू केली आहे. यासाठी लागणाऱ्या खर्चास शासनाने मंजुरीही दिली आहे.शेतीपूरक हा जोडधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधी 

काय आहे निरंतर वीज योजना?

■ ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी १५ वर्षापेक्षा जास्त जुने व तांत्रिकदृष्ट्या अकार्यक्षम असलेले विद्युत रोहितत्र बदलली जाणार.

■ विद्युत रोहित्रांचे ऑइल बदलून पूर्ण क्षमतेएवढी पातळी केली जाणार आहे.

■ ही योजना २०२३-२४, २०२४-२५, २०२५-२६ या तीन वर्षांमध्ये राबविण्यात येणार आहे. ही योजना राबविण्याची जबाबदारी महावितरण कंपनीची असणार आहे.

■ तांत्रिकदृष्ट्या अकार्यक्षम असलेले विद्युत रोहित्रे बदलण्यासाठी तसेच रोहित्रांचे ऑइल बदलण्यासाठी लागणाऱ्या खर्चास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबत ५ मार्च रोजी शासन निर्णय जारी केला आहे.

टॅग्स :वीजशेतीशेतकरीहिंगोली