जंगलाला वणवा लागू नये म्हणून दरवर्षी १५ फेब्रुवारीपर्यंत शेतालगतच्या, रस्त्यालगतच्या व रेल्वेलाइनलगतच्या जंगलात जाळ रेषा तयार करून वणव्यावर नियंत्रण आणले जाते. मात्र, यावर्षी मार्च महिना उजाडला तरी वन विभागाच्या व वन विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या जंगलात जाळ रेषा तयार करण्याची कामेच झाली नाहीत.
प्रसिद्ध अशा फुगडीगुट्टा जंगलात व इतर जंगलात जाळ रेषेची कामेच झाली नसल्याने यंदा वणव्याच्या तांडवात तालुक्यातील जंगल सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीपासून संरक्षण करण्यासाठी दरवर्षी जंगलात आगी लागतात अशा ठिकाणी जाळीची तीव्रता पाहून विशेषतः रस्त्यालगत, शेतालगतच्या व रेल्वेलाइन वर्ग एक, राखीव जंगल अशा ठिकाणी जंगल पेटू नये म्हणून जाळ रेषा तयार केली जाते.जाळ रेषेचा आराखडा तयार करून ऑक्टोबर महिन्यात मंजूर करून घेऊन डिसेंबरपासून जाळ रेषा काढायला सुरुवात केली जाते. गवत कापून सेंटरमध्ये टाकणे व ते वाळल्यानंतर ते जाळणे हे मजुरांकरवी कामे करून घेतली जातात.
जानेवारीमध्ये जाळ रेषा जाळण्याला सुरुवात करून १५ फेब्रुवारीपर्यंत फायरलाइन काढणे गरजेचे असते.
जंगलातील आग रोखण्यासाठी वन विभाग अलर्ट! काय उपाय योजण्यात येताहेत?
वेळेवर निधी प्राप्त होत नसल्याने संबंधित विभाग निधीची वाट पाहत जाळ रेषा जाळण्याचे काम हाती घेत नाही, अशी माहिती आहे.
मार्च उजाडला तरी यंत्रणेचे दुर्लक्ष
■ १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी हा फायरलाइन जाळण्याचा कालावधी असला तरी मात्र आज मार्च महिना उजाडला तरी जाळ रेषेला हात लावला नाही.
■ जाळ रेषेचा पत्ताच नसल्याने यंदाच्या उन्हाळ्यात वणव्याच्या घटनांत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सूत्रानुसार १५ फेब्रुवारी ते १५ मार्चपर्यंत जाळ रेषा जाळता येते; पण त्यास परवानगी घेऊनच जाळावेलागते, अशी माहिती आहे.