राज्यात एकीकडे पाऊस वर्तवण्यात येत असला तरी प्रत्यक्षात मात्र पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाड्यातील धरणांमधलापाणीसाठा घटत असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात अनेक भागांमध्ये पाणीटंचाईचे सावट निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये 'दुष्काळभय' निर्माण झाले आहे.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा आजच्या घडीला 33.66% एवढा आहे. तर मांजरा, दुधना, तेरणा धरणे ३० टक्क्यांवरही अजून गेली नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांना पिके वाचवायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मराठवाड्यातील येलदरी धरण ५९.९१ टक्के भरले असून माजलगाव धरण १३.९१% भरले आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची तहान भागवणारे उजनी धरणातील पाणीसाठा आता केवळ 13.36% असून मराठवाड्यातील धरणांची पाणी पातळी आणखी घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यंदा मुळातच उशिरा सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच परीक्षा घेतल्याचे चित्र आहे. खरीप पेरण्या झाल्या तरी पाऊस नसल्याने पिके माना टाकू लागली आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यातील अनेक पिकांना पाण्याचा ताण बसला असून परिस्थिती नाजूक असल्याचे शेतकरी सांगतात.
मराठवाड्यातील सर्वात कमी पाऊस फुलंब्री तालुक्यात
फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा महसूल मंडळात सर्वात कमी पाऊस झाला आहे. केवळ 53.90% पाऊस येथे झाला. तालुक्यातील खरीप पीक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याचे खरीप पाहणी अंतर्गत दिसून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसाअभावी पिके कोमेजून जात असल्याचे यावेळी निदर्शनास आले.