Join us

हलक्या सरींमुळे आंबा, काजूवर प्रादुर्भावाची भीती; कसे कराल व्यवस्थापन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 3:53 PM

डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही भागात शुक्रवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास तुरळक पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर दिवसभर अंशतः ढगाळ ...

डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही भागात शुक्रवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास तुरळक पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर दिवसभर अंशतः ढगाळ वातावरणाचा प्रत्यय आला. वातावरणातील या बदलाचा आंबा व काजू पिकांवर प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने बागायतदार, शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

पालघर जिल्ह्यात २८ आणि २९ मार्च रोजी हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरत हलक्या सरी कोसळल्या, तर वातावरणात किमान तापमान २२ ते २५ आणि कमाल तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस राहील, असे म्हटले आहे.

पालघर जिल्ह्यात आंबा आणि काजू ही मौसमी पिके असून या बदलत्या वातावरणाचा फटका बागायती पिकांना बसू शकतो. असे तज्ज्ञांनी सांगितले. आर्द्रतेत घट आणि बाष्पीभवनात वाढ झाल्याने आंबा झाडाला ताण बसून फळगळ होण्याची तसेच प्रखर सूर्यकिरणामुळे फळे भाजण्याची, फळे तडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदारांनी काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.

असे करा व्यवस्थापन - पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेस द्यावे.तसेच झाडाच्या बुंध्याभोवती आळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे.- आंबा फळांचे फळमाशीपासून तसेच प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच फळांचा आकार व वजन वाढून डाग विरहीत फळे मिळविण्यासाठी डॉ. बा.सा. कॉ. कृ. विद्यापीठाने दिलेल्या शिफारशीनुसार पिशव्यांचे आवरण घालावे.आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.वाढत्या तापमानामुळे आंबा फळांची होणारी गळ थांबविण्यासाठी, उत्पन्न वाढविण्यासाठी व प्रत सुधारण्यासाठी १ टक्के पोटॅशियम नायट्रेटची १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना साधारणतः १० ते १५ दिवसांच्या अंतराने तीन फवारणी कराव्यात.फळधारणा अवस्थेतील काजूवर फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :आंबाकीड व रोग नियंत्रणशेतकरीशेतीपाऊसपीक व्यवस्थापनफळे