हवामान खात्याने वर्तविलेला अवकाळी पावसाचा अंदाज खरा ठरल्यास नुकसान होऊ नये यासाठी सध्या मूग आणि भुईमूग सोंगणीच्या कामाला शेतकऱ्यांकडून चांगलाच वेग देण्यात आला आहे. पाऊस वेळेवर आल्यास खरीप हंगामाला सुरुवात करता यावी, यासाठी शेती मोकळी करून ठेवण्याची तजवीज केली जात आहे.
सोमवारपासून बुधवारपर्यंत वाशिम जिल्ह्यातील काही भागांत वादळी वारा आणि जोरदार स्वरूपात अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. यादरम्यान वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग प्रचंड प्रमाणात राहणार असल्याने शेतकऱ्यांकडून सध्या शेतात असलेल्या पिकांची काळजी घेतली जात आहे.
जिल्ह्यातील वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर आणि मानोरा या सहाही तालुक्यांमधील सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी उन्हाळ्यात मूग आणि काही शेतकरी भुईमुगाची पेरणी करतात. यंदाच्या अनुकूल वातावरणामुळे या दोन्ही पिकांची स्थिती उत्तम असून, वादळीवारा आणि अवकाळी पावसामुळे नुकसान होऊ नये, यासाठी सोंगणी करून विनाविलंब काढणी प्रक्रिया राबविण्याचे नियोजन शेतकऱ्यांकडून करण्यात आले आहे.
पुढील दोन दिवस धोक्याचे; काळजी घेणे गरजेचे!
वाशिम जिल्ह्यासाठी सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी हवामान खात्याकडून 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. अर्थात या दोन दिवशी काही ठिकाणी अवकाळी पाऊस जोरदार स्वरूपात हजेरी लावण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
विजांपासून करा स्वतःचा बचाव!
सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी ४० ते ५० किलोमिटर वेगाने वादळीवारा वाहणार असून यादरम्यान विजांचा प्रचंड कडकडाट होईल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांनी शेतात काम करतेवेळी विजांचा कडकडाट झाल्यास झाडाखाली कदापि थांबू नका. गुरांचा उघडा गोठा किंवा शेड असल्यास तिथे आसरा घ्या, असा सल्ला देण्यात आला.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेला अंदाज खरा ठरत रविवार, १२ मे रोजी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे मूंग आणि भूईमुंग सोंगणीच्या कामात व्यत्यय निर्माण झाला. यासह सोंगून ठेवलेल्या या शेतमालाचे काहीअंशी नुकसान झाल्याची देखील माहिती आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चितेत भर पडली आहे.
हेही वाचा - Organic Fertilizer गाजर गवतापासून या सोप्या पद्धतीने तयार करा दर्जेदार सेंद्रिय खत