Join us

अवकाळी पावसाच्या धास्तीने अनेक शेतकऱ्यांची कांदा काढणीसाठी धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 10:43 AM

अनेकांकडे नाही साठवणुकीची व्यवस्था: कमी भावात होतेय विक्री

विदर्भात चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या धास्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यात कांदा काढणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. साठवणुकीची व्यवस्था नसल्याने कमी भावातही अनेक शेतकरी कांद्याची विक्री करीत आहेत.

खरीप हंगामातील प्रत्येक पीक काढणीपासून रब्बी हंगामापर्यंत अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडले. रब्बी हंगामात तर हरभरा पिकाची झालेली माती शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान देऊन गेली. आता सुद्धा तीच स्थिती असून, ज्वारी व कांदा पिकांवर संकट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

हवामान अभ्यासकांनी ७ ते ११ मेपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता निर्माण झाली आहे. त्यात ४१ ते ४२ अंश सेल्सिअसच्या तापमानात सूर्य एकीकडे आग ओकत आहे, तर दुसरीकडे त्याच तापमानासोबत दोन हात करत शेतकरी कांदा तयार करून नाइलाजास्तव मिळेल त्या भावाने विक्री करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी शासनाने केवळ गुजरातच्या पांढऱ्या कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे विदर्भातील कांदा उत्पादक शेतकरी संताप व्यक्त करीत होते. परंतु, उशिराने का होईना आता लाल कांदादेखील निर्यातीस मोकळा झाला आहे. मात्र, अवकाळी पावसाचा संभाव्य धोका लक्षात घेता अल्पदरात शेतकऱ्यांना विकावा लागत आहे.

अवकाळी पावसाचा कांदा पिकाला फटका

गत दोन वर्षापासून खामगाव तालुक्यातील कांदा पिकाला अवकाळी पावसाचा सातत्याने फटका बसत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. कांद्यासोबतच मिरची पिकाचीही लागवड केली जाते. ही लागवडही अवकाळी पावसामुळे धोक्यात सापडली असून, मिरचीवर विविध रोग पडल्याचे चित्र खामगाव तालुक्यात दिसून येत आहे.

आता कांदा व ज्वारीचे पीक उंबरठ्यावर आहे. मात्र, हवामान अभ्यासकांनी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे कडक उन्हाच्या तडाख्यात कांदा तयार करावा लागत आहे. - राहुल वासनकार, शेतकरी.

हेही वाचा - एकरात लाखोंची कमाई देणारी तूर भारी; ऊस, कपाशीला आता नको म्हणतोय शेतकरी

टॅग्स :कांदाशेतकरीशेतीवादळपाऊसविदर्भ