पुणे : महिलांना घेऊन मसाला उद्योगात भरारी घेणाऱ्या उद्योजिका कमलताई परदेशी यांचे आज निधन झाले. मागच्या एका महिन्यापासून त्या आजाराने ग्रस्त होत्या. पुण्यातील ससून रूग्णालयात त्यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दौंड तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी 'आंबिका मसाले' या मसाल्याच्या ब्रँडला सातासमुद्रापार नेले होते. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर त्यांनी हे यश संपादन केले होते. त्यांच्या माध्यमातून जवळपास ८०० महिलांना रोजगार मिळाला होता. अखेर त्यांचे आज निधन झाले.
साधारण २००० साली त्यांनी बचत गटाद्वारे मसाला उद्योगात पाऊल ठेवले होते. त्या स्वत: निरक्षर असतानाही त्यांनी मसाला उद्योगाला मोठे केले आणि महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. कोरोना काळात त्यांच्या व्यवसायाला अनेक अडचणी आल्या पण त्यातूनही त्या जोमाने उभ्या राहिल्या होत्या. आज त्यांच्या मसाल्याचा ब्रँड अनेक देशात विकला जात आहे.