औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी सात तालुक्यांच्या जमिनीची सुपीकता पातळी कमी असल्याचे कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते.
राज्यात यंदा पावसाची मोठी तूट दिसून येत असताना महिना -दीड महिन्याच्या पावसाच्या खंडामुळे पिके होरपळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. दरम्यान वर्षानुवर्ष एकच पीक घेतल्याने जमिनीची सुपीकता काही तालुक्यांमध्ये कमी झाल्याचे चित्र आहे.
जमिनीची सुपीकता मोजण्याचा निर्देशांक काय?
जमिनीत असलेल्या किंवा टाकलेल्या म्हणजे पिकांची मुळे,पालापाचोळा , तणे, भर खते अशा सेंद्रिय पदार्थांमध्ये तसेच सूक्ष्मजीवांमध्ये असलेला कार्बन हा जमिनीच्या सुपीकतेचा निर्देशांक असतो.
दर हंगामात पिके जमिनीतील अन्नद्रव्य शोषून घेतात पण ती भरून काढण्यासाठी आपण काही करतो का? ही अन्नद्रव्य भरून न निघाल्याने जमिनीची सुपीकता कमी होते आणि ती आजारी पडू लागते. पण जमीन आजारी आहे की निरोगी हे ओळखायचं कसं? याचे सोपे उत्तर आहे सेंद्रिय कर्ब.
किती सेंद्रिय कर्ब असेल तर जमीन निरोगी?
जमिनीत जेवढे सेंद्रिय कर्बच प्रमाण जास्त तेवढी जमीन जास्त सुपीक! जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण शून्य ते ०.४ असेल तर ती जमीन आजारी म्हणून गणता येते. 0.4 ते 0.8 असे कर्माचे प्रमाण असेल तर ती जमीन सर्वसाधारण म्हणून गणली जाते. तर 0.8 पेक्षा अधिक कर्ब असेल तर जमीन निरोगी असते.
सर्वसाधारण कोणत्याही जमिनीत 45 टक्के माती, 25% पाणी, 25 टक्के हवा आणि पाच टक्के सेंद्रिय पदार्थ असे प्रमाण असते. मातीमध्ये काही सेंद्रिय अन्नद्रव्य असणे हे त्याच्या सुपीकतेचेच एक लक्षण.
औरंगाबाद जिल्ह्यातील जमिनीचा सुपीकता निर्देशांक किती?
औरंगाबाद जिल्ह्यातील जमिनीचा सुपीकतेचा निर्देशांक व पातळी जाणून घेऊया..
औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना धरून सेंद्रिय कर्बाचे एकूण प्रमाणे 1.35 एवढे आहे. त्यामुळे या विभागातील जमीन ही सुपीक म्हणून गणली जाते. परंतु तालुका निहाय विचार केल्यास काही तालुक्यांमध्ये हे प्रमाण कमी असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
छत्रपती संभाजीनगर मधील जमिनीतील सेंद्रिय कर्ब हे 1.39 एवढे असून जिल्ह्यातील सर्वाधिक आहे. त्यामुळे सुपीक त्याची पातळी ही मध्यम समजली जाते. तर सोयगाव तालुक्यातील जमिनीतील सुपीकतेचा निर्देशांक हा जिल्ह्यातील सर्वात कमी असून 0.95 एवढा आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी केवळ दोनच तालुक्यांमध्ये सुपीकतेची पातळी मध्यम असून उर्वरित सात तालुक्यांमधील सुपीकतेचा निर्देशांक कमी असल्याचे आकडेवारी सांगते. सेंद्रिय कर्बासोबत नत्र , स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाणही योग्य असणे आवश्यक आहे. ते नसले तरीही जमिनीच्या सुपीकतेवर त्याचा परिणाम होतो.
नत्राची मात्रा ही ओलावा टिकवून धरण्याच्या क्षमतेवर अवलंबून असल्याचे कृषी सहाय्यक अधिकारी सांगतात. जर जमिनीत आर्द्रता अधिक असेल तेव्हा नत्राचे प्रमाण महत्त्वाचे ठरते. औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण नत्राचे प्रमाण हे 1.19 आहे. त्यामुळे नऊ तालुक्यांमधील सुपीक त्याची पातळी कमी झाल्याचे दिसून येते.तर उपलब्ध स्फुरद आणि पालाश मध्यम ते भरपूर असल्याचे स्पष्ट होते.
कुठे कराल मातीचे परीक्षण?
मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांचे किंवा प्रत्येकी जिल्ह्याचे असे वेगळे माती परीक्षण केंद्र कृषी विभागात असते. या केंद्रामध्ये जमीन कुठल्या प्रकाराची आहे, मातीचा पोत काय आहे?, विशिष्ट पोत असणाऱ्या मातीत कोणत्या पिकाची लागवड करावी, अशा असंख्य प्रकारे मातीचे परीक्षण करता येते. तुमची जमीन आजारी आहे की निरोगी? हे तपासण्यासाठी मातीचे परीक्षण करणे आवश्यक आहे.