माहुली जहागीर गोदामातील अनधिकृत २.३९ कोटींच्या खत प्रकरणाची व्याप्ती पाहता पाळेमुळे खंदून काढण्यासाठी पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी शनिवारी रात्री चार तपास पथके गठित केली. यामध्ये एसडीपीओ सूर्यकांत जगदाळे यांच्या नेतृत्वात पाच अधिकारी तसेच २० पोलिस अंमलदार नियुक्त करण्यात आले.
चार पथकांपैकी एक पथक रविवारी सकाळी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे रवाना झाले आहे. जप्त रासायनिक खतांच्या बॅगवर जबलपूर येथील दोन कंपन्यांची नावे आहेत. या कंपन्यांची नोंदणी संशयास्पद वाटत असल्याने यावर प्रथम फोकस करण्यात आल्याची पोलिसांनी दिली. तपासात आणखी काही बाबींचा उलगडा होत पुढील कडी उलगडणार आहे.
कृषी व पोलिस विभागाच्या संयुक्त कारवाईत शुक्रवारी रात्री उशिरा माहुली जहागीर येथील अनधिकृत गोदामात छापा मारून २.३९ कोटींचे रासायनिक खत जप्त करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात विक्री बंद असलेला खतांचा २५ व ४० किलोच्या पॅकिंगमध्ये ११,७८९ बॅगमध्ये हा साठा होता. पुढील तपास पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ सूर्यकांत जगदाळे करीत आहेत.
प्रतिबंधित खतांच्या वापराने शेतकऱ्यांचे भविष्यात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घटनेचे गांभीर्य पाहता गुन्ह्याचा सखोल तपास होण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चार पथके गठित केल्याचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितले.
या कंपन्यांची चौकशी
जबलपूर येथील विजया नवभारत फर्टिलायझर, विनम्रो नवभारत फर्टिलायझर, मंडला येथील चॅम डायमंड डी बायोटेक्नॉलॉजी, लीडर शिवशक्त्ती बायो व खजाना बायो. धानूस शिवशक्ती बायो, मंडला तसेच हैद्राबाद येथील धनिक शिवशक्त्ती अॅग्रोटेक, धरणी शिवशक्ती अॅग्रोटेक, ज्युपीटर शिवशक्ती अॅग्रोटेक, धनराज शिवशक्ती अॅग्रीटेक, जोश शिवशक्ती अॅग्रीटेक व खास शिवशक्ती अॅग्रीटेक
सायबर पीआय अन् कृषी अधिकारी सोबतीला
गुन्ह्याच्या तपास कामात पथकाला तांत्रिक मदत व्हावी, यासाठी सायबर ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांचे पथक पुरविण्यात आले आहे. अमरावती पंचायत समितीचे कृषी अधिकारी उद्धव भावेकर हेदेखील तपास पथकासोबत राहणार आहेत.