fertilizer Issue :
हिंगोली : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत नेते, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी व्यस्त असताना जिल्ह्यात खतांचा तुटवडा जाणवत आहे. या संदर्भात 'लोकमत ऍग्रो'ने वृत्त प्रकाशित करताच कृषी विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी (२८ ऑक्टोबर) कृषी निविष्ठा विक्री केंद्राची तपासणी करीत त्रुटी आढळलेल्या तीन केंद्रांना नोटीस बजावली आहे.
जिल्ह्यात हिंगोली, वसमत व कळमनुरी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्याअनुषंगाने अधिकारी, नेते, उमेदवार निवडणुकीत व्यस्त असताना शेतकऱ्यांना मात्र खतांच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे.
ऐन रब्बी हंगामात खतासाठी धावपळ करावी लागत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या वृत्ताची दखल घेत कृषी विभागाच्या जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथकाने सोमवारी (२९ ऑक्टोबर) हिंगोली शहरातील कृषी निविष्ठा विक्री केंद्राची अचानक तपासणी सुरू केली. यात तीन ठिकाणी त्रुटी आढळून आल्या. या कृषी निविष्ठा विक्री केंद्रांना पथकाने नोटिसा बजावल्या असून, खुलासा सादर करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, पथकाने तपासणी केली असता कृषी निविष्ठा विक्री केंद्रामध्ये मुबलक खताचा साठा असल्याचे पथकाला आढळून आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी प्रदीप कच्छवे, कृषी विकास अधिकारी अतुल वायसे, तालुका कृषी अधिकारी एस. एस. रणखांब, तालुका गुण नियंत्रण अधिकारी आर. एन. पुंडगे यांचा समावेश होता.
खताचा मुबलक साठा, मग टंचाई कशी?
जिल्ह्यात २३ व २५ ऑक्टोबर रोजी डीएपी खत उपलब्ध झाले. तसेच युरिया व इतर खतही जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. असे असताना खताची टंचाई कशी जाणवत आहे? खताची कृत्रिम टंचाई तर केली जात नाही ना? असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
खताची लिंकिंग अथवा जादा दराने विक्री होत असल्यास कृषी विभागास कळवा
जिल्ह्यात खत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. कोणत्याही खतासोबत लिंकिंग (इतर खत) करणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. कोणत्याही खतासोबत लिंकिंग (इतर खत) करत असल्यास किंवा जादा दराने विक्री करीत असल्यास तालुका व जिल्हास्तरीय कृषी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.