अलिबाग, थळ येथे मिश्र खत निर्मिती प्रकल्प उभारण्याचा आरसीएफ कंपनीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने एल अॅण्ड टी कंपनीला हा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट दिले असून, २७ महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
हा विस्तार भूसंपादन न करता होणार आहे. या प्रकल्पात युरिया आणि अमोनिया खतांची निर्मिती होते. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे खताच्या आयातीचे प्रमाण कमी होणार असून मिश्र खताच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
आरसीएफ खत निर्मिती प्रकल्पातून सध्या युरिया आणि अमोनिया खताची निर्मिती करण्यात येत आहे. आता प्रकल्पाचा विस्तार होणार असून युरिया आणि अमोनिया बरोबरच मिश्र खतांची निर्मिती करण्यात येणार आहे.
यासाठी १००० कोटी रुपयांची गुंतवणूक कण्यात येणार असून, प्रकल्पातून दररोज १२०० मेट्रिक टन मिश्र खत तयार करण्याचा प्रयत्न असेल. कंपनीच्या संचालक मंडळाने एल अॅण्ड टी कंपनीला हा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट दिले आहे.
खताच्या किमती कमी होणार- डीएपीसारख्या मिश्र खतांना बाजारात मोठी मागणी आहे. मात्र भारतात त्याचे फारसे उत्पादन होत नसल्याने त्याची आयात करावी लागते. मिश्र खतांची मागणी २०१८-१९ मध्ये साडेसहा हजार दशलक्ष टनावर पोहोचली होती. त्यानंतर रशिया-युक्रेनमधील युद्ध स्थितीमुळे त्याच्या आयातीवर परिणाम झाला होता.- ही बाब लक्षात घेऊन आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत देशांतर्गत मिश्र खतांच्या निर्मितीवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने मिश्र खत निर्मिती प्रकल्प उभारणीस मान्यता दिली असून, कंपनीच्या संचालक मंडळाने प्रकल्प उभारणीचे कंत्राट मंजूर केले आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत कामाला सुरुवात होणार आहे.- देशांतर्गत मिश्र खतांचे उत्पादन सुरू झाल्यामुळे खतांच्या किमती कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.