गजानन मोहोड
अमरावती : पुण्याच्या परवानाप्राप्त कंपनीद्वारे बोगस खत विकल्याचा प्रकार महिनाभरापूर्वी उघडकीस आला होता. आता पुन्हा कृषी विभागाचाच परवाना असलेल्या सातारा जिल्ह्यातील एका कंपनीच्या रासायनिक खतांचे नमुने अप्रमाणित आले आहेत.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर येथील एका कृषी केंद्रातून ही खते विकली गेली. या कंपनीच्या १७८ पोत्यांचा साठा विक्री बंद करण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांची लाखो रुपयांनी फसवणूक झाल्याचे वास्तव आहे.
कृषी उपसंचालक उज्ज्वल आगरकर, जिल्हा कृषी अधिकारी अजय तळेगावकर व धामणगाव तालुक्याचे कृषी अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी मंगरुळ दस्तगीर येथील बुटले सेवा केंद्रातील रासायनिक खतांचे नमुने घेतले होते. त्यानंतर एसएओ राहुल सातपुते यांनी पथकासह पाहणी व चौकशी केली होती.
दरम्यान, या नमुन्यांचा अहवाल अप्रमाणित आल्याने डीएपी, एनपीके १०:२६:२६, एनपीके १४:०७:१४ व २४:२४:०० या खतांचा उर्वरित साठा विक्री बंद करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. ग्रीनफिल्ड अॅग्रीकेम इंडस्ट्रीज, तरडगाव, ता-फलटन, जि-सातारा व या कंपनीच्या संबंधित जार्डन कंपनीचे ही खते आहेत.
मंगरुळसह परिसरातील गावांमध्ये या खतांची दीड हजारांवर पोत्यांची विक्री झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या अप्रमाणित खतांमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे व पिकांचेही नुकसान झाल्याचे वास्तव्य आहे.
कृषी संचालकांना मागितले मार्गदर्शन
• रासायनिक खतांचे नमुने अप्रमाणित आलेल्या ग्रीनफिल्ड कंपनीचे लायसन्स, आयएफएमएस कोड, एक्पोर्ट-इपोर्ट याशिवाय अन्य कागदपत्रे ओके असल्याचे कृषी विभागाने सांगितले. मात्र नमुने अप्रमाणित आल्याने परवान्यावर कारवाई तसेच आवश्यक कारवाई करण्याबाबत राज्याचे कृषी संचालक यांच्याकडे मार्गदर्शन मागितल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
वर्धा जिल्ह्यातून झाला खतांचा पुरवठा
वर्धा जिल्ह्यातून तसेच पुलगाव येथून संबंधित खतांचा पुरवठा झालेला आहे. जिल्ह्यात फक्त मंगरुळ दस्तगीर येथील याच केंद्राला पुरवठा झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. यवतमाळ जिल्ह्यातही या खतांचा पुरवठा झाल्याची शक्यता आहे. शिवाय हे खत पॉसमशीन शिवाय विक्री करण्यात आलेले आहे. कृषी विभागाद्वारा यावर काय कारवाई होते, याकडे शेतकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ग्रीनफिल्ड अॅग्रीकेम अन् जॉर्डन कंपनीचे खत
मंगरुळ दस्तगीर येथील कृषी केंद्रातून घेतलेले ग्रीनफील्ड व जार्डन या कंपनीच्या रासायनिक खतांचे नमुने अप्रमाणित आले आहेत. कंपनीचे कागदपत्रे ओके असल्याने आवश्यक कारवाई करण्याबाबत कृषी संचालक यांना मार्गदर्शन मागितले आहे. याबाबत सूचना मिळाल्यास त्वरीत कारवाई करण्यात येईल. - राहुल सातपुते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.