राज्याचे कृषिमंत्री अमरावती विभागात असताना कृषी विभागाने राबविलेल्या धाडसत्रात माहुली जहांगीर शिवारातील गोदामात अनधिकृत साठवणूक केलेल्या ११,५७९ रासायनिक, सेंद्रिय खतांच्या बॅग व द्रवरूप खतांचा साठा असा २.३९ कोटींचा साठा जप्त करण्यात आला. आंध्र प्रदेशातील एका कंपनीचे हे खत असल्याचे कृषी विकास अधिकाऱ्यांनी सांगितले.
याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा माहुली जहांगीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्याची दशकातील ही पहिलीच कारवाई ठरली आहे. जप्तीमधील खतांचा साठा पाहता विदर्भात किमान २५ हजारांवर बॅगची विक्री झाली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे. यामध्ये विनापरवानगी व अनधिकृत साठवणूक, मान्यता नसलेले खत ग्रेड करुन उत्पादन करणे व याद्वारे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
विभागीय कृषी सहसंचालकांच्या आदेशाने ही कारवाई सुरू करण्यात आली, ती शनिवारी पहाटे सहापर्यंत सुरू होती. पोलिसांनी गोदामातील खतांसह खतांच्या बॅग असलेले दोन ट्रक, एक लॅपटॉप, सीपीयू जप्त करण्यात आले. अमरावती पं.स. चे कृषी अधिकारी उद्धव मयेकर यांच्या तक्रारीवरून माहुली जहागिर ठाण्यात भादंवि ४२०, ३४, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ याशिवाय रासायनिक खते (नियंत्रण) आदेशाच्या विविध कलमान्वये सुनील कुमार (उत्तर प्रदेश), सांभा अडपाल (क्षेत्रीय व्यवस्थापक, माहुली), अनंत वाडोकर (माहुली), पुरुषोत्तम साबळे (माहुली), महेशकुमार जाठ (भोपाल) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास माहुली पोलीस करत आहे.
विविध २५ प्रकारात खतांचा साठा
आंध्र प्रदेशातील कंपनीचा विविध २५ प्रकारात हा खतसाठा आहे. कंपनी नोंदणीकृत असली तरी खत साठवणुकीचा परवाना नाही, काही खतांना विक्रीला परवाना नाही, खतांच्या बॅग २५ ते ४० किलोच्या आहेत. द्रवरूप खत एक लिटर याप्रमाणे कॅनमध्ये आहे. विशेष म्हणजे, १०:०५:१० या खताला राज्यात विक्रीला परवानगी नसल्याचे एडीओ यांनी सांगितले.
कृषी विभागासोबत पोलिसांची संयुक्त कारवाई
कृषी विकास अधिकारी अजय तळेगावकर, जि.प.चे मोहीम अधिकारी प्रवीण खर्चे, विभागीय गुणनियंत्रण निरीक्षक संजय पाटील, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक सागर डोंगरे, अमरावती पंसचे कृषी अधिकारी उद्धव मयेकर, माहुलीचे एपीआय मिलिंद सरकटे, पीएसआय संजय उदासी व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी ही संयुक्तपणे कारवाई केली.
विदर्भात कुणाला विक्री, लॅपटॉपमध्ये माहिती
या रासायनिक खतांची विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात कुणाला विक्री केली, याची माहिती जप्त लॅपटॉपमध्ये असण्याची शक्यता आहे. तपासात ही माहिती समोर येणार आहे. याशिवाय या गावांमध्ये विक्री प्रतिनिधींद्वारे खतांची विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
कंपनीसोबत गोदामाचा करारनामा संशयास्पद
अनंत वाडकर यांनी शेतातील जागेत असलेल्या गोदामासाठी कंपनीसोबत करारनामा केला होता, त्याची मुदत संपलेली असून एकूण प्रकार संशयास्पद आहे. याशिवाय गोदामातील खतांसाठी साठवणुकीचा परवाना नसल्याने तो अनधिकृत ठरतो.
माहुली जहागीर शिवारातील गोदामात असलेल्या रासायनिक खतांचा अनधिकृत साठा जप्त केला. माहुली ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. अधिक माहिती पोलिस तपासात उघड होईल.
- अजय तळेगावकर, कृषी विकास अधिकारी.