Maharashtra Rabi Season Fertilizers Availability : शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या पेरण्यांची तयारी सुरू केली आहे. मूग, उडीद, बाजरी, सोयाबीन पिकांची काढणी सुरूवात झाल्यामुळे रब्बीच्या पेरण्या तोंडावर आल्या आहेत. बियाण्यांसोबत शेतकरी खतांचीही पेरणी करत असतात. त्याामुळे सध्या राज्यामध्ये खतांची उपलब्धता असणे आवश्यक आहे. खरीप आणि रब्बीच्या हंगामासाठी केंद्र सरकार प्रत्येक राज्यासाठी खतांचा कोटा मंजूर करत असते.
दरम्यान, कृषी आयुक्तालयाने मागणी केलेल्या खतांपेक्षा कमी खत केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. युरिया, डीएपी आणि पोटॅश या खतांच्या मागणीपेक्षा कमी मंजुरी केंद्र सरकारकडून मिळाली आहे. त्यामुळे या रब्बी हंगामात या खतांची कमतरता भासू शकते. तर ही मंजुरी २० सप्टेंबर पर्यंतची असून अजूनही या कोट्यामध्ये वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर २० सप्टेंबरपर्यंत एकूण अपेक्षित खतांच्या तुलनेत ६० टक्के खतांचा पुरवठा केंद्राकडून करण्यात आला आहे.
राज्यासाठी युरिया १० लाख टन, डीएपी २.५ लाख टन, म्युरेट ऑफ पोटॅश १ लाख टन, मिश्र खते १२ लाख टन, सिंगल सुपर फॉस्फेट ६ लाख टन असे मिळून एकूण ३१ लाख ५० हजार टन खतांना मंजूरी मिळाली आहे. त्याचबरोबर नॅनो युरियाच्या ३४ लाख ७० हजार बाटल्या आणि डीएपीच्या ११ लाख बाटल्या केंद्र सरकारकडून यंदाच्या रब्बी हंगामात मंजूर करण्यात आल्या आहेत. तर ३ लाख टन मागणी असलेल्या डीएपीला २ लाख ५० हजार टनांची मंजुरी दिल्यामुळे या खताची कमतरता भासण्याची शक्यता आहे.
भेसळयुक्त खतांपासून सावधान!
खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांची भेसळयुक्त खते आणि बोगस बियाणांचा पुरवठा करून फसवणूक केली जाते. तेलंगणा, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त खते महाराष्ट्रात छुप्या मार्गाने येतात. अनेकदा खतांमध्ये माती मिसळल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी खते खरेदी करताना खात्रीशीर विक्रेत्याकडून घेतली पाहिजेत.