Join us

Fertilizers Issue : खत तुटवड्याचे संकट गडद ; 'कृषी' विभागाने पत्र धाडूनही उपयोग होईना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2024 1:59 PM

सध्या रब्बीची पेरणी सुरू आहे. तर दुसरीकडे मुबलक जलसाठा निर्माण झाल्याने ऊस लागवडीवर ही शेतकरी भर देताहेत. असे असतानाच खत तुटवड्याचे संकट दिवसागणिक गडद होऊ लागले आहे. (Fertilizers Issue)

Fertilizers Issue : 

धाराशिव : सध्या रब्बीची पेरणी सुरू आहे. तर दुसरीकडे मुबलक जलसाठा निर्माण झाल्याने ऊस लागवडीवर ही शेतकरी भर देताहेत. असे असतानाच खत तुटवड्याचे संकट दिवसागणिक गडद होऊ लागले आहे. 

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये १८ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ८ हजार मेट्रिक टन खत आजवर मिळालेले नाही. तर नोव्हेंबर अन् डिसेंबरमध्ये २४ हजार मे.टन आवंटन मंजूर असताना एक बॅग ही कंपन्यांनी पुरवठा केलेली नाही, हे विशेष.

यंदा जिल्हाभरात दमदार पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे रब्बी पेरणी लांबली. सध्या बहुतांशी भागात रब्बीची पेरणी सुरू आहे. अशावेळी शेतकऱ्यांना रासायनिक खताची गरज असतानाच तुटवड्याचे संकट गडद झाले आहे.

मंजूर आवंटनाप्रमाणे जिल्ह्याला खत उपलब्ध होत नसल्याने कृषी विभागाची डोकेदुखी वाढली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत सुमारे १८ हजार मेट्रिक टन खत कंपन्यांकडून उपलब्ध होणे अपेक्षित होते.

मात्र, तसे झाले नाही. नोव्हेंबर महिना संपत आला असतानाही सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील मंजूर १८ हजारांपैकी ८ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झालेले नाही.

नोव्हेंबर-डिसेंबर या दोन महिन्यात २४ हजार मेट्रिक टन खत जिल्ह्यात दाखल व्हायला हवे. परंतु, खत उत्पादक कंपन्यांकडून हात आखडता घेतला जात आहे. २४ हजार मेट्रिक टन आवंटनापैकी एक बॅगही खत उपलब्ध झालेले नाही. एकीकडे मागणी वाढली असून दुसरीकडे कंपन्यांकडून खत उपलब्ध होत नसल्याने टंचाई तीव्र होत आहे.

२० ते २५ हजार मेट्रिक टन खत...

जिल्हाभरात रब्बी पेरणी सुरू आहे. त्यामुळे खताला मागणी आहे. मात्र, कंपन्यांकडून खत उपलब्ध होणे जवळपास बंद झाले आहे. त्यामुळे स्वत तुटवड्याचे संकट अधिक गडद झाले आहे. सध्या जिल्हाभरातील विक्रेत्यांकडे मिळून केवळ २० ते २५ हजार मेट्रिक टन एवढेच खत उपलब्ध आहे. हे खत रब्बी पेरणीला ही पुरेल एवढे ही नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

बॅगेमागे दोनशे रूपये वाढले !

एकीकडे सोयाबीन सारख्या पिकाला दर मिळत नाही. ३ हजार ९०० ते ४ हजार २०० रूपये प्रतिक्विंटल एवढ्या अल्प दराने सोयाबीन विकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. शेतकरी संकटात असतानाच काही खत उत्पादक कंपन्यांनी खताच्या एका बॅग मागे दोनशे रूपयांची वाढ केली आहे. पूर्वी ही बॅग १ हजार २०० रूपयांना येत होती. आता १ हजार ४०० रूपये मोजावे लागत आहेत, हे विशेष.

उसाला खत आणायचे कोठून ?

यंदा दमदार पाऊस झालेला आहे. धाराशिव जिल्हाभरात लहान-मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. नदी-नाले वाहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल उसाकडे वाढला आहे. उसासाठी खत मोठ्या प्रमाणात लागते. असे असतानाच दुसरीकडे खत तुटवड्याचे संकट गडद झाले आहे. खत कंपन्यांनी आखडता हात घेतल्याने शेतकऱ्यांसह कृषी विभागाचीही चिंता वाढली आहे.

शासनस्तरावर पाठपुरावा

सप्टेंबर-ऑक्टोबरमधील मंजूर आवंटनाप्रमाणे खत उपलब्ध झालेले नाही. जवळपास ८ हजार मेट्रिक टन एवढी तूट आहे. तर नोव्हेंबर व डिसेंबरसाठी २४ हजार मेट्रिक टन आवंटन मंजूर असले तरी अद्याप पुरवठा झालेला नाही.  ही बाब शासनाला लेखी स्वरूपात कळविली असून खत पुरवठा करण्याबाबत विनंती केली आहे. - प्रमोद राठोड, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव.

टॅग्स :शेती क्षेत्रखतेरब्बीशेतकरीशेती