बदनापूर (जि. जालना) : केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपुर व कृषि विज्ञान केंद्र बदनापूर यांच्या वतीने सोमवार (दि.३०) रोजी विशेष कापूस प्रकल्पा अंतर्गत मौजे दूधपुरी (ता. अंबड) येथे प्रक्षेत्र दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पुंजाराम माळोदे, प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव गवारे उपस्थित होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून विषय विशेषज्ञ डॉ. डी. बी. कच्छवे, तांत्रिक मार्गदर्शक कापूस प्रकल्प अजित डाके, आणि कृषि सहाय्यक मोहिते आदी उपस्थित होते.
यावेळी अजित डाके यांनी प्रास्ताविक करतांना विशेष कापूस प्रकल्पाचे महत्व व उद्देश समजावून सांगितला. तसेच कापूस पिकाचा कालावधी सध्या संपत आल्याने शेतकऱ्यांनी फरदड कापूस न घेता श्रेडर मशीनच्या सहाय्याने कापसाच्या पऱ्हाटीची कुट्टी करून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे आव्हान त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.
तर डॉ.डी. बी. कच्छवे यांनी कपाशी पिकाचे जागतिक स्तरावरील महत्व समजावून सांगताना सघन लागवड पद्धतीने कपाशी पिकाचे एकरी उत्पादन वाढवले जाऊ शकते व शेतकरी बांधवांना सघन पद्धतीने कपाशी लागवड करण्याचे आवाहन केले.तसेच जमिनीचे आरोग्य व एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी प्रगतशील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर अजित डाके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष कापूस प्रकल्पाचे अभिलाष बनसोडे, अमोल दाभाडे यांनी पुढाकार घेतला होता.