भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर व कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील प्रमुख पिक असणाऱ्या कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार मार्फत विशेष कापूस प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात व तामिळनाडु राज्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पा अंतर्गत दि. २६ डिसेंबर २०२३ रोजी कृषि विज्ञान केंद्र, परभणीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे ताडबोरगाव (खु). ता. मानवत जि. परभणी येथे दादा लाड तंत्रज्ञानाने केलेल्या कापूस लागवड प्रक्षेत्रावर विशेष प्रक्षेत्र दिन आयोजन करण्यात आले.
मौजे. ताडबोरगाव ता. मानवत येथे आयोजित केलेल्या प्रक्षेत्र दिन कार्यक्रमामध्ये डॉ. उषा सातपुते, तांत्रिक प्रशिक्षक, विशेष कापूस प्रकल्प, कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांनी कापूस पिकातील दादा लाड लागवड तंत्रज्ञांना विषयी सविस्तर माहिती दिली. कापसाच्या उत्पादन वाढी करता योग्य अंतर ३X१ आणि २X१, लागवडी नंतर ४० ते ४५ दिवसांनी गळ फांदी काढुन टाकणे, शेंडा खुडुन 3 फुटापर्यंत झाडांची उंची पारंपारीक पध्दतीपेक्षा कमी ठेवुन फळ फांदीला योग्य प्रकारे अन्नद्रव्य मिळाल्यामुळे बोंडाची संख्या व आकार वाढवुन उत्पादनात वाढ होईल या बद्दल मार्गदर्शन केले.
कापूस वेचणी स्वच्छ करावी तसेच कापूस काढणीनंतर पराटीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी अनियंतत्रित पध्दतीने न जाळता पायरोलिसिस या नियंत्रित ज्वलन पध्दतीव्दारे बायोचार तयार होतो. बायोचार हा कोळशाचा एक प्रकार असून त्यामध्ये अधिक प्रमाणात कार्बन व इतर अन्नद्रव्य असतात, तो शेतीस कशा प्रकारे उपयुक्त ठरवु शकतो या बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कुंडलिक खुपसे, तांत्रिक प्रशिक्षक, विशेष कापूस प्रकल्प, कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शेतकऱ्यांना कापूस हे पिक डिसेंबर महिन्याच्या शेवटी पुर्ण वेचणी करुन काढुण टाकावी, कपाशीची फरदड घेणे टाळावे जेणे करुन पुढील हंगामामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळाता येईल, व स्वच्छ कापूस वेचणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी पुढील हंगामात दादा लाड तंत्रज्ञान लागवड पध्दतीचा वापर करुन आपल्या उत्पादकतेमध्ये वाढ करावी असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन अमित तुपे यांनी केले. या कार्यक्रमासाठी मोजे. ताडबोरगाव, पेडगाव, देवलगाव आवचार या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन नामदेव काळे यांनी केले.