मारेगाव तालुक्यात कापूस पिकाची वेचणी आता अंतिम टप्प्यात असून मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मजुरांना अर्ध्या हिस्स्यावर कापूस द्यावा लागत आहे. यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे.
फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून बियाणे, लागवड, मजुरी, खते, फवारणी वेचणी या सर्वांची बेरीज करता कापूस पिकात त्यांना काहीही राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. तालुक्यात यावर्षी अतिवृष्टी, वाढलेला पावसाळा, कापूस पीक जोमात असताना पावसाचा पडलेला ताण, यामुळे कापसाचे पीक अचानक वाळले. परिणामी, दोन वेचणीत कापसाची उलंगवाडी झाली आहे. आता कापूस वेचणीला मजूर मिळणे कठीण आहे. कापूस वेचणी अंतिम टप्प्यात आल्याने शेतकरी आणि मजुरांमध्ये कापसाची वाटणी होत असल्याने शेतकऱ्यांना कापूस प्रतिक्विंटल तीन हजार रुपये खर्च येत आहे.
आता रब्बीची तयारी करण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील असून त्यामुळे जेवढा येईल तेवढा कापूस काढून त्या शेताची मशागत करून गहू, मका, हरभरा यांसारखी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. आधीच एवढा खर्च करूनही हातात दोन पैसे येत नाही. एवढेच नाही तर लावलेला खर्चही निघणे ही अवघड होऊन बसले आहे.