कायम दुष्काळी म्हणून ओळख असणाऱ्या खटाव तालुक्याला कृषी विमा नुकसानभरपाईतून पहिल्या टप्प्यात वगळल्याने शेतकऱ्यांच्यात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मात्र, २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्याने या योजनेत खटाव तालुक्याचा समावेश झाल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे.
जुलै, ऑगस्ट महिन्यांत पावसाने खंड दिल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. तर ज्या शेतकऱ्यांनी पिके जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या उत्पादनावर प्रचंड परिणाम होणार आहे. खरीपपीकविमा योजनेत २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्यास तातडीची नुकसानभरपाई म्हणून विमा भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ दिली जाते. हा निकष गृहित धरून राज्यातील १३ तालुक्यांमधील ५३ मंडळांत पिकांच्या नुकसानीबाबत सर्वेक्षण करावे, असे निर्देश कृषी आयुक्तांनी दिले होते. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना मदत मिळण्याची आशा आहे.
सातारा जिल्ह्यातील माण फलटण तालुक्यातील मंडळाचा पहिल्या टप्प्यात झाला. मात्र, खटाव तालुक्यातील मंडळांचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त होत होती. दुष्काळाचा कलंक कपाळी घेऊन फिरणाऱ्या खटावला का वगळले आहे, याबाबत शेतकऱ्यांच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले होते. तर खटावला तीन आमदार दोन खासदार असूनही खटाववर अन्याय का होत होता, त्याला सापत्नपणाची वागणूक का मिळत आहे, याचा विचार जनता करू लागली होती. मात्र, दुसऱ्या टप्प्यात २१ दिवसांचा पावसाचा खंड पडल्याने नऊ मंडळांचा समावेश झाल्याने तालुकावासीयांना दिलासा मिळणार आहे. औंध, पुसेसावळी, मायणी, कलेढोण, कातरखटाव, वडूज, खटाव, पुसेगाव व बुध या नऊ मंडळांचा समावेश खरीप पीकविमा योजनेत झाला आहे. विमा भरताना रांगेत उभे राहून, सर्व्हरची वाट पाहत ताटकळत बसत खरीप पीकविमा योजनेत सहभाग नोंदविला होता.
शासनाने कृषी पीकविमा एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी हजारो शेतकयांनी रांगा लावून पीकविमा भरले होते. सुरुवातीला खटावला वगळले, अशी आम्हाला माहिती मिळाली होती." मात्र, खटावमधील नऊ मंडळांचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. - अनिल पवार, राज्य प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना
पहिल्या टप्प्यात आपल्या तालुक्याचा समावेश झाला नव्हता. आता मात्र सलग २१ दिवस पावसाचा खंड पडल्याने खटाव तालुक्याचा पीकविमा योजनेमध्ये समावेश झाला आहे. - आर. एन. जितकर, तालुका कृषी अधिकारी, खटाव