मिलेट्स म्हणजेच भरडधान्ये किंवा तृणधान्यांचे मानवी आहारामध्ये खूप महत्त्व आहे. भारतातील लोकांचे पारंपारिक अन्न हेच होते. पण हरितक्रांतीनंतर आपल्याकडे गहू आणि तांदळाचे आहारातील प्रमाण वाढत गेले आणि भरडधान्याचे प्रमाण कमी होत गेले. २०२३ हे वर्ष सर्वांनी आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष म्हणून साजरे केले. त्यानंतर मिलेट्सचे महत्त्व पुन्हा जगाला कळाले. पण मिलेट्समध्ये असलेल्या ८ ते १० धान्यांची ओळख आपल्याला आहे का?
ज्वारी, बाजरी, रागी किंवा नाचणी, सावा, वरई, कांगणी किंवा राळ, भगर, सामा किंवा कोराळे, कोद्रा हे प्रमुख भरडधान्ये आहेत. या भरडधान्यांपैकी 'रागी किंवा नाचणी' या पिकाची सखोल माहिती जाणून घेऊयात.
रागी किंवा नाचणी (Fingure Millets)
* किंगर मिलेट आफ्रिकन बाजरी या नावानेही ओळखली जाते, तिला रागी किंवा नाचणी असे म्हणतात. आफ्रिकेतील मध्यपूर्वेकडील मोठ्या भागांमधील व भारतातील अनेक भागांमधील ते एक महत्वाचे धान्य आहे.
* हा एक लहान तृणधान्याचा प्रकार असून भारतात व आफ्रिकेतील अनेक प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, महाराष्ट्र व उत्तराखंड याठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर पिकवण्यात येतो व त्याचे सेवन करण्यात येते.
* (फिंगर मिलेट) नाचणी हे सर्वाधिक पोषक तृणधान्य मानले जाते. नाचणी ही प्रथिने, तंतुमय घटक व खनिजे यांचा उत्तम स्त्रोत आहे. त्यात ५-८% प्रथिने, ६५-७५% कर्बोदके, १५-२०% पचनशील तंतुमय घटक व २.५-३.५% खनिजे असतात.
* (फिंगर मिलेट) नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम व पोटॅशियम असते. या तृणधान्यात कमी चरबीयुक्त (मेद) घटक (१.३%) असतात. १०० ग्रॅम नाचणीमध्ये ढोबळमानाने सरासरी ३३६ कॅलरीज ऊर्जा असते.
* नाचणी ग्लुटेन-मुक्त असल्यामुळे ग्लुटेनचा त्रास असणाऱ्या व पोटाचा (सोलियाक) विकार असणाऱ्या लोकांसाठी उत्तम पर्याय ठरु शकते.
* नाचणी अमिनो आम्लांनी समृध्द असते व त्यात फायटेटस, पॉलिफिनॉल्स व टॅनिन यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे, वयानुरुप होणारे विकार व चयापचयाशी निगडीत विकारांमध्ये महत्त्वाचे कार्य करणारे अँटिऑक्सिडेंट्स म्हणुन क्रिया करु शकतात.
* नाचणीमध्ये असलेल्या कमी ग्लायसेमिक संवेदनशीलतेमुळे नाचणीयुक्त आहारामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रणात ठेवण्यात मदत होते.
* रक्तदाब, यकृताचे विकार व दमा यांमध्ये नाचणीयुक्त आहार घेण्याची शिफारस करण्यात येते.
* स्तनपान करणाऱ्या मातांसाठी या आहाराची शिफारस केली जाते. यात नैसर्गिक लोह भरपूर प्रमाणात असते आणि त्याच्या सेवनामुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते
(माहिती संदर्भ - महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे)