राज्य शासनाने घोषित केलेल्या ‘नमो किसान महासन्मान’ योजनेतून राज्यातील सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांप्रमाणे पहिल्या हप्त्याचे गुरुवारी (दि.26) रोजी शिर्डी (जि.अहमदनगर) येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर वितरण करण्यात येणार असून यासाठी कृषी विभागाने 1720 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.
विशेष मोहीमेमुळे हे शेतकरी ठरले पात्र
दरम्यान ‘पी एम किसान’ योजनेचा पुढील हप्ता तसेच ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्यासाठी ऑगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम राज्य शासनामार्फत राबविण्यात येत होती.
या मोहिमेद्वारे राज्यातील 13 लाख 45 हजार शेतकरी ‘पी एम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेसाठी पात्र ठरले असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
हेही वाचा :
पीएम किसान सन्मान निधीसोबत क्रेडिट कार्डही मिळणार
३ लाख ६० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीआधीच चार हजार जमा होणार
‘पी एम किसान’ योजना नव्याने सुरू करण्यात आली, त्यावेळी राज्यातील सुमारे 1 कोटी 19 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली होती. त्यांपैकी सुमारे 95 लाख शेतकरी पात्र ठरले. मात्र, अटींची पूर्तता न केल्याने 13 व्या आणि 14 व्या हप्त्यात त्यापैकी 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना ‘पी एम किसान’चा प्रत्यक्ष लाभ मिळाला. उर्वरित शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेता आला नाही.
95 लाखांपैकी मृत, कर भरणारे व इतर कारणांनी रद्द करून 92.87 लाख शेतकरी पात्र ठरत आहेत. त्यापैकी 82.59 लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झालेले होते.