कृषी विभाग, आत्मा व मत्स्य विभाग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी शेततळ्यातील मत्स्यपालन प्रात्यक्षिक आधारित प्रशिक्षणाचे आयोजन मौजे भार्डी (ता. नांदगाव) येथील प्रगतिशील शेतकरी अशोक मार्कंड यांच्या शेतावर (दि.०६) शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले होते.
यावेळी मत्स्य विभागाचे मुख्य तांत्रिक अधिकारी मंगेश आंधाळे आणि ज्युनिअर तांत्रिक अधिकारी जुही विजय नायर यांचे शांतीलाल नारायण मार्कंड यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देत स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्यात कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक एस. टी. कर्नर यांनी केले.
प्रस्ताविकेत कर्नर यांनी शेततळ्यातील मत्स्यपालन प्रकल्पासाठी मत्स्य विभागाकडून मत्स्यबीज कल्चर आणि मत्स्य खाद्य यांचा प्रात्यक्षिकासाठी किट पुरवण्यात येईल असे सांगितले. तसेच, मत्स्यपालन करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी, खाद्य संगोपन, विक्री व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.
तदनंतर मत्स्य विभागाचे मंगेश आंधाळे यांनी मत्स्य व्यवसाय का करावा? कसा करावा? मत्स्यबीज संवर्धन, पूर्वतयारी, मत्स्य जाती, खाद्य संगोपन, मत्स्य वाढ, पाणी व्यवस्थापन, साठवणूक व वाहतूक, विक्री व्यवस्थापन आणि मत्स्य विभागाच्या योजनांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर, शेततळ्यात मत्स्यबीज सोडण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
या कार्यक्रमात कृषि सहाय्यक भार्डी आर बी कदम, कृषि पर्यवेक्षक डी. बी. देवरे, कृषि पर्यवेक्षक मनमाड सुमित सूर्यवंशी, कृषि सेवक अस्तगाव यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात नांदगाव तालुक्यातील भालुर, कऱ्ही, वंजारवाडी, भार्डी, अस्तगाव आणि जातेगाव येथील शेतकरी उपस्थित होते.
सदरील कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी रविंद्र डमाळे आणि मंडळ कृषी अधिकारी एकनाथ अंभुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित तज्ञ प्रशिक्षक आणि शेतकऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हेही वाचा : Farmer Success Story : सरकारी योजनेचा मिळाला आधार; गणेशरावांनी केली आर्थिक विषमतेवर मात