Join us

कोल्हापूरमधील पाचशे शेतकऱ्यांचा शेततळ्याला नकार

By राजाराम लोंढे | Published: July 20, 2023 3:48 PM

जिल्ह्यातील ८२० शेतकरी पात्र : ५१ लाखांचा निधी मंजूर; केवळ २८ कामे पूर्ण

शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाचा स्रोत उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य सरकारने 'मागेल त्याला शेततळे' योजना सुरू केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेल्यांमधून ८२० शेतकऱ्यांची निवड कृषी विभागाने केली होती. त्यासाठी तब्बल ५१ लाखांचा निधीही मंजूर झाला, मात्र प्रत्यक्षात केवळ २८ शेतकऱ्यांनीच शेततळ्याचे काम पूर्ण केले आहे. 

शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ करून सातत्यता आणण्यासाठी आणि सततच्या पाणीटंचाईवर यशस्वीरीत्या मात करण्यासाठी सरकारने २०१६ला 'मागेल त्याला शेततळे' ही योजना सुरू केली. यावर्षी मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पाण्याअभावी पिके वाळून जात असताना बघत बसण्याखेरीज काहीच करता येत नव्हते. अशा परिस्थितीत शेततळ्याच्या माध्यमातून संरक्षित पाणी केले तर त्याचा थोडाफार काही होईना पिकासाठी फायदा होऊ शकतो.

कोल्हापूर जिल्ह्यात सिंचनाखालील क्षेत्र जास्त असल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लाभार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे. कृषी विभागाकडून यंदा ८२० शेतकरी पात्र ठरले. त्यातील ५०० शेतकऱ्यांनी आपणाला शेततळे नको म्हणून सांगितले आहे. उर्वरित ३२० पैकी ७० जणांनी काम सुरू केले, त्यापैकी २८ कामे पूर्ण झाली आहेत.

ड्रॉ पद्धतीने होते निवड शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी ऑनलाइन अर्ज करायचे आहे.• जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती ड्रॉद्वारे शेतकऱ्यांची निवड करते.

शेततळ्यासाठी हे आहेत निकष • शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असावी.• जमीन शेततळ्यासाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक.• यापूर्वी शेततळे किंवा सामुदायिकरीत्या शेततळ्याचा लाभ घेतलेला नसावा.■ शेतकऱ्यांचे बँकेत खाते असणे आवश्यक.

मान्सून काहीसा बेभरवशाचा झाल्याने शेततळे उपयुक्त आहे. जिल्ह्यासाठी ८२० शेतकऱ्यांना मंजूर झाले होते मात्र ५०० शेतकऱ्यांना नाकारले.- दत्तात्रय दिवेकर, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी

टॅग्स :सरकारी योजनाशेतीकोल्हापूर