विठ्ठल खेळगी
सोलापूर : मागील वर्षी कांद्याचा दर कमी झाल्याने शासनाने कांद्याला ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र, अद्यापही सोलापूर बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या सुमारे पाच हजार शेतकऱ्यांना अद्यापही अनुदानच मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी बाजार समितीत हेलपाटे मारून वैतागले आहेत.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री होते. मागील वर्षी जानेवारी महिन्यात कांद्याची आवक वाढली. दररोज सरासरी १ हजार ट्रक कांद्याची आवक होती. त्यानंतर फेब्रुवारीपासून कांद्याचा दर कोसळला. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळालेला नाही. त्यामुळे राज्य शासनाने कांदा अनुदान देण्याचा निर्णय घेतला.
२०० क्विंटलपर्यंत ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याचे जाहीर केले. त्यानुसार शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आल्या. सोलापूर बाजार समितीकडे ३८ हजारा शेतकऱ्यांचे अर्ज आले. त्यातील ३१ हजार अर्ज पात्र ठरले. छाननीनंतर अनुदानासाठी शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला होता. त्यानुसार सोलापूर अनुदान प्राप्त झाले.
सोलापूर, कुर्डूवाडी, पंढरपूर, बार्शी, मंगळवेढा, अकलूज आणि बार्शीतील लक्ष्मी-सोपान बाजार समित्यांकडील ३८ हजार २०४ अर्ज पात्र झाले होते. त्यासाठी १०१ कोटी अनुदान मंजूर झाले. त्यात सोलापूर बाजार समितीसाठी ८७ कोटी रुपये अनुदान मंजूर झाले. दोन टप्यात अनुदान देण्याचा निर्णय झाला.
अनुदान वितरित झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांची नावेच नसल्याचे समोर आले. तेव्हापासून मागील पाच-सहा महिन्यांत शेतकरी सतत बाजार समितीत हेलपाटे मारत आहेत. मात्र, कोणाकडून ठोस उत्तरे मिळत नाही. उताऱ्यावर कांद्याची नोंद नाही. आधार क्रमांक चुकीचा आहे. खाते क्रमांक चुकलेला आहे, अशी कारणे सांगितले जात आहेत.
अधिक वाचा: कांदा अनुदानाचा नवा जीआर आला, कुणाला मिळणार अनुदान? वाचा सविस्तर
एकमेकांकडे बोट; शासनाकडून आले नाही
कांदा अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांना केवळ आश्वासने देत आहेत. मात्र, बाजार समितीतील लोक उपनिबंधक कार्यालयाकडे बोट दाखवितात. ते शासनाकडून आले नाही असे सांगतात. आता शासनाकडे अहवाल पाठविलेला आहे. निर्णय झाल्यानंतर देऊ अशी उत्तरे मिळतात. त्यामुळे शेतकरी वैतागून गेले आहेत.