Floral Market :
इस्माईल जहागीरदार :
श्रावण महिन्यात अनेक सण, उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतात. हीच बाब लक्षात घेता चार दिवसांपासून गुलाब, शेवंतीसह इतर फुलांना चांगलीच मागणी वाढली आहे. त्यामुळे फूल उत्पादकांसह विक्रेत्यांना 'अच्छे दिन' आल्याचे पाहायला मिळत आहेत. बाजारात सध्या वेगवेगळे सुगंधी फुलं दाखल झाले आहेत.
श्रावण महिना सुरू होताच विविध सण, उत्सवास प्रारंभ झाला आहे. सुरुवातीला फुलांचा बाजार थोडा गडगडला होता; परंतु आजमितीस सर्वच फुलांना बाजारात मागणी वाढली असून उत्पादकांसह विक्रेतेही आनंदी दिसत आहेत.
आजतरी मंडईत फूल खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे. धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांसह इतर छोट्या-मोठ्या सणांना फुले घेऊन जाताना नागरिक दिसत आहेत.
वसमत शहर हे हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने त्या ठिकाणचे उत्पादक शेवंती, मोगरा, जास्वंद, गुलाब, केवडा, निशिगंध, डच गुलाब, झेंडू आदी फुले घेऊन शहरात दाखल होत आहेत.
फुलांना मागणी वाढल्याचे लक्षात येताच विक्रेत्यांनी फुले खरेदी करणे सुरू केले असून शहरात अनेक ठिकाणी दुकाने थाटली गेली आहेत. तालुक्यातील शेतकरी आनंदी आहेत.
शेजारच्या नांदेड जिल्ह्याबरोबर पुणे व इतर ठिकाणांवरून फुले शहरात येऊ लागली आहेत. वर्षभरापासून फुलांना मागणी वाढत असल्याने तालुक्यातील शेतकरीही फूल उत्पन्न घेण्याकडे
वळले आहेत.
१० ते २० गुंठ्यांत फूल शेती करू लागले आहेत. बोराळा, म्हतारगाव यासह इतर गावांत अनेक शेतकरी फूल शेती करू लागले आहेत.
फुलांना चांगला भाव; उत्पादक आनंदी
गेल्यावर्षी फुलांना भाव मिळाला नाही; परंतू यंदा चांगला भाव मिळत आहे. असाच भाव या पुढेही मिळावा. जेणेकरून घरखर्च भागेल, असे शेतकऱ्यांना वाटते.
- गंगाधर इंगोले, शेतकरी
फुलांच्या भावात चढ व उतार नेहमीच होत असतो. परंतू सद्यःस्थितीत सण, उत्सवाचे दिवस असल्याने भाव चांगला मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आनंदी आहेत.
- पंजाब जाधव, शेतकरी
नांदेड, पुणे येथून येतात फुले
लाल व पिवळा झेंडू जिल्ह्यात मिळतो; पण गुलाब, शेवंती, केवडा, डच गुलाब व इतर फुले नांदेड व पुणे या जिल्ह्यांतून येतात. यासाठी रोजच्या रोज ऑर्डर करावी लागते.
- बाळू जाधव, विक्रेता
असे आहेत फुलांचे भाव (किलोमध्ये)
गुलाब ३००
केवडा २५०
शेवंती ३५०
मोगरा ३००
झेंडू ९०
डच गुलाब ३००
निशिगंध २५०