Join us

नवरात्रोत्सवाकडून फुल उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या बाजारभावाची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 8:46 AM

फुले ही नाशवंत असल्याने त्यांना तातडीने बाजारपेठ, वाहतूक व्यवस्था शेतमजुरांची उपलब्धता, पाण्याची गरज, नवीन तंत्रज्ञान आदी बाबींची आवश्यकता असते.

पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात सध्या पिवळी जर्द शेवंतीची शेतं डोलताना पाहून कुणालाही निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार वाटावा, असे दृश्य दिसत आहे. त्याच्या बरोबरच लाल, पिवळ्या रंगांची टपोरी झेंडूची शेती बहरली आहे. यावर्षी गणेशोत्सव काळात फुलशेतीच्या माध्यमातून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने काहीसा हिरमुसलेला शेतकरी नवरात्रोत्सवाकडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहे.

फुले ही नाशवंत असल्याने त्यांना तातडीने बाजारपेठ, वाहतूक व्यवस्था शेतमजुरांची उपलब्धता, पाण्याची गरज, नवीन तंत्रज्ञान आदी बाबींची आवश्यकता असते. सुपा परिसरातून पुणे, मुंबईसह अन्य राज्यांत फुले नेण्याची सुविधा आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी एक नगदी उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून फुलशेतीकडे वळल्याचे वाघुंडे येथील फूल उत्पादक शेतकरी शशिकांत रासकर, सुदाम रासकर, दादाभाऊ थिटे, नाना मगर यांनी सांगितले.

सुपा, हंगा, शहजापूर, वाळवणे, आपधूप, वाघुंडे, पळवे, रायतळे आदी गावांतील शेतकरी फुलशेती करतात. सुपा येथील फुलांचे हार प्रसिद्ध असून वर्षभर चालणान्या या व्यवसायातून अनेक तरुण व बेरोजगारांना स्थानिक पातळीवर रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. त्यांना वर्षभर फुले लागतात.

या वाणांना मिळते पसंती.शेवंतीमध्ये गावरान राजा, सेंट व्हाइट, ऐश्वर्या यलो, पेपर व्हाइट, पर्पल व्हाइट, प्रमिला यलो, तर झेंडूमध्ये निशिगंधा, अष्टगंधा यलो व लाल, कलकत्ता पिवळा व लाल असे वाण शेतकरी घेत असल्याचे शरद रासकर, पप्पू गाडीलकर, मेजर पोपट गवळी, संजय रासकर, विश्वनाथ रासकर यांनी सांगितले.

असा मिळावा भावगणेशोत्सव काळात शेवंतीला ६० ते ७० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. त्याआधी ८० ते ९० रुपयांचा दर होता. दर वाढण्याऐवजी कमी झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गणिते बिघडली. शेवंतीला किमान १८० ते २०० रुपये प्रतिकिलो व झेंडूला १०० ते १२० रु. प्रतिकिलो भाव मिळाला तरच फुलशेती थोडीफार परवडेल, असे शेतकरी सांगतात.

लागवडीतही अनेक बदल- पूर्वी शेवंतीची काडी लावून रोप तयार करून लागवड केली जात असे. आता ही पारंपरिक पद्धत बंद झाली असून, नर्सरीच्या माध्यमातून कलम रोप आणून लागवड केली जाते.- त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीने कमी पाण्यात फुलशेतीचा प्रयोग यशस्वी होत असल्याचे शशिकांत रासकर यांनी सांगितले. जास्त उत्पादन देणारी कलमे बाजारात मिळत असून पाहिजे त्या प्रमाणात फुले उमलण्यासाठी औषधी देण्यासाठी व मर्यादित पाणीसाठ्यावर फुलशेती करण्यासाठी आम्ही ठिबक सिंचनाचा वापर करीत असल्याचे संजय रासकर यांनी संगितले.

टॅग्स :शेतकरीपीकफुलंशेतीठिबक सिंचन