अस्मानी संकटाशी दोन हात करीत, शेतकऱ्यांनी शेतात जगवलेला शेतमाल मार्केट यार्डात येत आहे. भाववाढीच्या प्रतीक्षेत, अनेकांनी शेतमाल साठवून ठेवला. मात्र भावात पाहिजे तसा चढाव येत नसल्यामुळे अखेरीस शेतकऱ्यांनी बाजार समितीचे मार्केट यार्ड गाठत, मिळेल त्या भावात विक्री सुरू केल्याचे चित्र आहे.
भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सोयाबीन खरेदीला प्रारंभ झाला. तेव्हा ३,५८० ते ४,५५० रुपयांपर्यंत भाव होता. आज हा भाव कमीत कमी ३,८०० ते जास्तीत जास्त ४,५०० रुपयांपर्यंत आहे. ७ फेब्रुवारीपर्यंत मार्केट यार्डात ३३,६४३ क्विंटल सोयाबीनची आवक होती. आता त्यात निश्चितच वाढ झालेली आहे. कापूस खरेदीचा शुभारंभ २ नोव्हेंबर २०२३ रोजी झाला. त्यावेळी ६,६०० ते ७,२०० रुपयांपर्यंत भाव होता.
आता ७,१०० रुपयांपर्यंत भाव आहे. ८ फेब्रुवारीपर्यंत १२,२०० क्विंटल कापसाची आवक होती. गत पंधरा ते वीस दिवसांपूर्वी मार्केट यार्डात हरभरा खरेदीला सुरुवात झाली असून, सध्या ५००० ते ६,१०० रुपयांपर्यंत भाव आहे. एकंदरीत ज्या जिद्दीने व ताकतीने शेतकरी रात्रंदिवस शेतात घाम गाळून पिकांना जगविण्यासाठी सतत धडपड असतो, त्या तुलनेत शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल आहेत.
'ते' वर्ष कधी येईल?
गत दोन वर्षापासून मार्केटमध्ये शेतमालाला मिळणारा भाव शेतकरी आत्महत्यासदृश परिस्थितीचे वास्तव दर्शविणारा आहे. मात्र त्यापूर्वीचे वर्ष बघितले तर, कापसाचा भाव १२ हजार पार तर सोयाबीनही ७ हजार पार होता. त्यानंतर भावात आलेली सततची घसरण शेतकऱ्यांना रडकुंडीस आणणारी ठरली आहे.