Join us

चारा महागला, कडब्याला प्रतिशेकडा मिळतोय एवढा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 11:09 AM

दुष्काळाच्या झळा : शेतकरी, पशुपालक हवालदिल; पशुधन जगविण्याचे आव्हान

एप्रिलच्या सुरुवातीला दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहे. अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने आता जनावरांना लागणारा चारासुद्धा महागला आहे. पशुधन जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर असताना कडब्याचा भाव प्रतिशेकडा ३,००० ते ३,५०० रुपये झाल्याने पशुपालकांसमोर संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे सारकिन्ही परिसरातील शेतकरी, पशुपालक हवालदिल झाला आहे.

२६ व २७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी व हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे ज्वारी, हरभरा पिकांचा पेरा कमी झाल्याने पशुधनासाठी लागणाऱ्या चाऱ्याची कमतरता भासू लागली. चारा उपलब्ध होत नसल्याने कडब्याचे भाव वाढले असून, हरभऱ्याच्या कुटाराचे भावसुद्धा वाढले आहे. एका ट्रॉलीचे ६ ते ७ हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना मोजावे लागतात. त्यामुळे पशुपालकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

कडबा गोठ्यापर्यंत नेण्यासाठी लगबग

बैलगाडी, ट्रॅक्टर आदी वाहनांमधून कडबा गोठ्यापर्यंत नेण्यासाठी पशुधन मालकांची लगबग सुरू आहे. बाजारात कडब्याला मागणी असून, साधारण मार्च-जूनपर्यंत कडब्याची खरेदी व विक्री होते. त्यामुळे दूध व्यावसायिक, पशुपालन करणारे शेतकरी कडब्याला प्राधान्य देतात. मात्र, मागणीच्या तुलनेत नेहमीच कडब्याचा तुटवडा होत असल्याचे दिसून आले आहे.

सोयाबीनचे कुटार खराब झाले व आता हरभरा पिकांचे खराब झाले. त्यात पुन्हा गारपीट व अवकाळी पावसामुळे राब झाला असून, यावर्षी चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता- युवराज चव्हाण, शेतकरी, सारकिन्ही

दुसऱ्या गावातून चारा खरेदी

जनावरे कसे जगवावे, अशी चिंता शेतकऱ्यांना आहे. शेतकरी दुसऱ्या गावातून मिळेल त्या भावात चारा खरेदी करून आणत असल्याचे चित्र आहे. जनावरांना पोषक आहार म्हणून कडब्याला व हरभरा पिकांच्या कुटाराला मागणी आहे.

ज्वारीचा पेरा कमी

ज्यांच्याकडे बैल जोडी, गायी, म्हशी, इतर जनावरे आहेत, असे शेतकरी जनावरांपुरता ज्वारी व हरभरा पिकांचा पेरा करतात. अनेक शेतकरी खुरपणी, काढणी, कडबा बांधणी या भानगडीत न पडता हरभरा, सोयाबीनची पेरणी करतात. त्यामुळे ज्वारीचा पेरा कमी क्षेत्रात असल्याने यंदा कडबा भाव खात आहे.

बैल, ८ गायी असल्यामुळे कडबा, कुटार जास्त प्रमाणात कडबा, कुटाराचे भाव खूप वाढल्यामुळे हवालदिल झालो राठी लागणारा चारा विकत घेऊन आणण्याची हिंमत होत नाही. - महादेव आंबेकर, शेतकरी, सारकिन्ही

टॅग्स :चारा घोटाळापाणीदुग्धव्यवसाय