लातूर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम, वैरण व पशुखाद्य कार्यक्रम अंतर्गत (सर्वसाधारण) या योजनेतून सुधारित बाजरा नं. १ व मॅक्स सायलेज संकरित मका बियाणे शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे.
लातूर जिल्ह्यातील दहाही तालुक्यांतून या योजनेसाठी अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना आवश्यक कागदपत्रे संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (वि.), पंचायत समिती अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याकडून उपलब्ध करून घ्यावेत.
पूर्णपणे भरलेले विहित नमुन्यातील अर्ज २५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यात जमा करावेत, लाभार्थ्यांची निवड पात्र अर्जामधून सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे ४ ऑक्टोबरनंतर प्राप्त होणाऱ्या अथवा अपूर्ण अर्जाचा निवडीच्या सोडतीसाठी विचार केला जणार नाही.
जिल्ह्यात पशुधनाचे प्रमाण वाढावे त्याचबरोबर जनावरांना उच्चप्रतीचा चारा मिळावा म्हणून शासनाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी लवकरात लवकर अर्ज करावेत. ड्रॉ पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
४ ऑक्टोबरपर्यंत प्रस्तावासाठी मुदत...
• दुभत्या पशुधनास सकस चारा मिळावा तसेच शेतकऱ्यांचा पशु खाद्यावरील सर्च कमी व व्हावा म्हणून शासनाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
• जिल्ह्यातील पशुपालकांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. जे. तडवी, जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी डॉ. बी. यु. बोधनकर यांनी केले आहे.