Join us

दूध उत्पादन वाढविण्यासाठी सव्वाकोटीचे मिळणार चारा बियाणे; योजनेच्या लाभासाठी असा करा प्रस्ताव!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 10:30 AM

दूध उत्पादन (Milk Prodcution) वाढीसाठी पशुधनास पौष्टिक हिरवा चारा (Green Fodder) उपलब्ध होणे आवश्यक असते. दरम्यान, लवकर संततधार पाऊस न झाल्यास चाराटंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात (Kharif) पशुपालकांना १ कोटी ३२ लाखांचे चारा बियाणे (Fodder Seeds) उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यातील दूध उत्पादन (Milk Production) वाढीसाठी पशुधनास पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध होणे आवश्यक असते. दरम्यान, लवकर संततधार पाऊस न झाल्यास जिल्ह्यात चाराटंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने यंदाच्या खरीप हंगामात पशुपालकांना १ कोटी ३२ लाखांचे चारा बियाणे उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

गतवर्षीच्या पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाले. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ७३ टक्के पाऊस (Rain) झाला होता. त्यामुळे खरीप हंगामातील (Kharif) पिकांच्या उत्पादनात घट झाली. शिवाय, रब्बी पिकांच्या उत्पन्नावरही परिणाम झाला होता. त्यातच यंदाचा उन्हाळा अधिक कडक जाणवल्याने पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने परजिल्ह्यात चारा विक्रीस बंदी घालण्यात आली होती.

दरम्यान, पावसाळा सुरू झाला असला तरी संततधार पाऊस नाही. त्यामुळे हिरव्या चाऱ्याचा (Green Fodder) प्रश्न उ‌द्भवण्याची भीती नाकारता येत नाही, असे गृहीत धरून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने हिरवा चारा टंचाई निर्मूलनासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

साडेपाच हजार शेतकऱ्यांना लाभ...

लातूर जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुदानावर चारा बियाणे (Fodder Seeds) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचा जिल्ह्यातील जवळपास साडेपाच हजार पशुपालकांना लाभ होणार आहे. अनुदानावर उच्च गुणवत्तेचे संकरित शुगर ग्रेस ज्वारी चारा बियाणे १० हजार ६३२ किलो, मॅक्स सायलेज मका चारा बियाणे २६ हजार ५८० किलो असे एकूण ३७ हजार २१२ किलो चारा बियाणे मिळणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

३७ हजार किलो बियाणे...

खरीप हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यास चाराटंचाई जाणवू शकते, अशी परिस्थिती उद्भवू नये. पशुधनास हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर ३७ हजार २१२ किलो चारा बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने १ कोटी ३२ लाखांचा निधी उपलब्ध उपलब्ध करून दिला आहे.

योजनेच्या लाभासाठी तत्काळ अर्ज करा...

लातूर (Latur) जिल्ह्यात गायवर्गीय पशुधन २ लाख ५६ हजार १८०, म्हैसवर्गीय पशुधन २ लाख ५५ हजार ४७० आहे. पशुधनास पौष्टिक चारा उपलब्ध व्हावा म्हणून शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे देण्यात येणार आहे. त्यासाठी पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अर्जासह ७/१२ देणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील पशुपालकांनी लाभ घ्यावा...

दूध उत्पादनवाढीसाठी पौष्टिक हिरवा चारा आवश्यक असतो. पाऊस लांबल्यास चाराटंचाई जाणवू शकते. अशा परिस्थितीत हिरवा सकस चारा उपलब्ध व्हावा म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पशुपालकांनी त्याचा लाभ घ्यावा. त्यामुळे चाऱ्यावरील खर्च कमी होण्यास मदत होईल. - डॉ. श्रीधर शिंदे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

हेही वाचा - Animal Care In Rain शेतकरी दादा ! पावसाळ्यात आजारांचा धोका, पशुधनाची काळजी घ्या

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीशेतीगायपाऊसदुष्काळलातूर