राज्यातील अनेक भागात यंदा पाऊस कमी असल्याने चारा टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अवर्षणसदृश स्थिती पाहता उन्हाळ्यात शेवटी चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने प्रशासनाने नियोजन करण्यास प्रारंभ केला असून संभाव्य चाराटंचाई टाळण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनाही प्रस्तावित केल्या आहेत.
राज्यातील अनेक भागात यंदा पाऊस कमी असल्याने चारा टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. बहुतांश जिल्ह्यात चारा साठा कमी असल्याने आगामी पावसाळ्यापर्यंत पुरवणे कठीण होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, बुलढाणा तालुक्यात दुष्काळी स्थिती जाहीर झाली आहे. दोन्ही तालुक्यांत दुष्काळी सवलतीही लागू करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील 92 पैकी 86 मंडळामध्ये दुष्काळसदृश स्थिती असून 6 मंडळामध्ये तुलनेने चांगली स्थिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हाच दुष्काळसदृश स्थितीमध्ये येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मे-जून महिन्यात प्रसंगी चाराटंचाई जाणवण्याची भीती व्यक्त होत आहे. वास्तविक कागदोपत्री जिल्ह्यात तूर्तास चाराटंचाई नसली तरी अवर्षणसदृश स्थिती पाहता रब्बी हंगामात अपेक्षित चाऱ्याचे उत्पादन न झाल्यास तथा पाऊस प्रसंगी उशिरा आल्यास चाराटंचाईची तीव्रता वाढू शकतो.
परजिल्ह्यात चारा वाहतुकीस बंदी
कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात चाराटंचाईची स्थिती गंभीर बनू शकते. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देशित केले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात उत्पादित चारा, मुरघासाची अन्य जिल्ह्यात वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच चारा विक्रीसंदर्भात अन्य जिल्ह्यातील निविदाधारकांना चायाचा लिलावा करण्यात येऊ नये, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी अनुषंगिक आदेशात स्पष्ट केले आहे.
दररोज 3433 मेट्रिक टन चाऱ्याची गरज
बुलढाणा जिल्ह्यातील छोटी-मोठी गुरे, बकया, मेंढ्या मिळून 12 लाखांच्या आसपास पशुधन आहे. या पशुधनाला जून 2024 पर्यंत 8 लाख 23 हजार 836 मेट्रिक टन चाऱ्याची गरज लागणार आहे. रब्बीतील बिकट परिस्थिती पाहता प्रसंगी दीड लाख मेट्रिक टन चाऱ्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासाने आपत्कालीन परिस्थितीत अडचण येऊ नये म्हणून परजिल्ह्यांत चारा वाहतुकीस बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान दररोज 3433 मेट्रिक टन चाऱ्याची गरज भासते तर दर महिन्याला 1 लाख 2 हजार 980 मेट्रिक टन इतका चारा आवश्यक असतो. आणि जवळपास 9 लाख 93 हजार 543 मेट्रिक टन इतका चारा विविध मार्गातून उपलब्ध होत असतो.